नांदेड : जुन्या नांदेडातील वाहतुकीची समस्या सोडवण्यासाठी आता नवा उड्डाणपूल करण्याच्या हालचाली सुरू असून हा उड्डाणपूल बरकत कॉम्प्लेक्स ते वाजेगाव पोलीस चौकीपर्यंत नेण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे़ याबाबत सर्वेक्षणही हाती घेण्यात आले असून सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत हे सर्वेक्षण केले जात आहे़
राज्यातील सत्ताबदलानंतर आता जिल्ह्यात विकास कामांचे प्रस्ताव वेग धरू लागले आहेत़ पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांनी या विकासकामांना गती देण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत़ जुन्या नांदेडात मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होत आहे़ विशेषत: देगलूरनाका येथे वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे़ वाढती लोकसंख्या, वाहनांची संख्या तसेच अरुंद रस्ते यामुळे वाहतुकीचा प्रश्न बिकट झाला आहे़ या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी आता गोदावरीनदीवर चौपदरी पूल करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे़
पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी आपल्या नांदेड दौऱ्यात या प्रस्तावाबाबत सविस्तर चर्चाही केली आहे़ या प्रस्तावाच्या अनुषंगाने कार्यवाही करण्याचे निर्देशही त्यांनी संबंधितांना दिले आहेत़ गोदावरीनदीवर १८ मीटर रुंदीचा चार पदरी उड्डाण पूल उभारण्याबाबत हालचाली सुरू आहेत़ बरकत कॉम्प्लेक्स ते वाजेगाव पोलीस चौकीपर्यंत जवळपास २६०० मीटर लांबीचा पूल प्रस्तावित आहे़ उड्डाण पुलाची मुख्य लांबी ही २२०० मीटर इतकी राहणार आहे़ तर पुलाच्या दोन्ही बाजुंनी २०० मीटर लांबीचा अॅप्रोच राहणार आहे़ पुलाच्या स्लीप रोडची लांबी ही दोन्ही बाजूंनी १६०० मीटर इतकी असेल़ या पुलासाठी जवळपास ३८५ कोटी खर्च येईल असा अंदाज काढण्यात आला आहे़ महापालिकेची आर्थिक क्षमता लक्षात घेता हे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करून घेण्यात येणार आहे़ त्या दृष्टीने सर्वेही सुरू आहे़
दरम्यान, शहरातील गुरुद्वारा चौक येथे होणारी वर्दळ पाहता रस्त्यांबाबत उपाययोजना करण्यासंदर्भात पालकमंत्री चव्हाण यांनी सूचना दिल्या आहेत़ देश-विदेशातून ऐतिहासिक श्री सचखंड गुरुद्वारा दर्शनासाठी भाविक येत असतात़ या भाविकांना सुविधा देण्याबाबत प्रयत्न केले जाणार आहेत़ त्याचवेळी शहरात मुख्य रस्ता एकच असल्याने वाहतुकीचीही कोंडी होत आहे़ या पार्श्वभूमीवर राज कॉर्नर ते मुथा चौक रस्त्यावर उड्डाण पुलाबाबतही विचार करणे आवश्यक आहे़ शहरात हा उड्डाणपूल झाल्यास वाहतुकीचा प्रश्न मोठ्या प्रमाणात मार्गी लागू शकणार आहे़
शहरातील रस्ते पुन्हा सा़बां़विक़डेमहापालिकेने सार्वजनिक बांधकाम विभागाकडून शहरातील हस्तांतरीत केलेले रस्ते पुन्हा सा़बां़विक़डे परत करण्याच्या हालचालीही सुरू आहेत़ जवळपास १४ रस्ते सा़बां़विक़डे देण्यात येणार आहेत़यामध्ये छत्रपती चौक ते राज कॉर्नर, वर्कशॉप टी पॉर्इंट ते नागार्जुना हॉटेल, वर्कशॉप टी पॉर्इंट महात्मा फुले चौक, महात्मा फुले चौक ते अण्णा भाऊ साठे चौक, डॉ़शंकरराव चव्हाण चौक ते माळटेकडी गुरुद्वारा, माळटेकडी गुरुद्वारा ते नमस्कार चौक, महाराणा प्रताप चौक ते बाफना, रेल्वे स्टेशन ते देगलूर नाका, जुना मोंढा-नवीन पूल ते आंबेडकर चौक या रस्त्यांचा समावेश आहे़ महापालिकेची आर्थिक क्षमता पाहता या रस्त्यांची देखभाल-दुरुस्ती करणे शक्य नसल्याची बाब पाहता हे रस्ते पुन्हा सा़बां़विक़डे परत करण्याबाबत प्रस्ताव ठेवण्यात आला आहे़.