अर्थसंकल्पात ना घोषणा, ना करवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2019 12:47 AM2019-07-18T00:47:41+5:302019-07-18T00:50:24+5:30

शहरात पाणीपुरवठा, ड्रेनेज लाईन तसेच इतर मूलभूत सुविधांसाठी आर्थिक तरतूद वाढवावी, वार्षिक देखभाल दुरुस्तीच्या निविदा झोननिहाय न काढता प्रभागनिहाय काढाव्या यासह केळी मार्केटमध्ये नगरसेवकांच्या नातेवाईकांना दुकान उपलब्ध करुन दिल्याच्या विषयावरुन महापालिकेची अर्थसंकल्पीय सभा वादळी ठरली.

No announcement or no increase in the budget | अर्थसंकल्पात ना घोषणा, ना करवाढ

अर्थसंकल्पात ना घोषणा, ना करवाढ

Next
ठळक मुद्देमहापालिका: फेरबदलाचे अधिकार महासभेने केले महापौरांना बहालमूलभूत सुविधांवरच झाली चर्चा

नांदेड : शहरात पाणीपुरवठा, ड्रेनेज लाईन तसेच इतर मूलभूत सुविधांसाठी आर्थिक तरतूद वाढवावी, वार्षिक देखभाल दुरुस्तीच्या निविदा झोननिहाय न काढता प्रभागनिहाय काढाव्या यासह केळी मार्केटमध्ये नगरसेवकांच्या नातेवाईकांना दुकान उपलब्ध करुन दिल्याच्या विषयावरुन महापालिकेची अर्थसंकल्पीय सभा वादळी ठरली. पण त्याचवेळी या सभेत अर्थसंकल्पातील फेरबदलाचे सर्वाधिकार महापौरांना एकमताने देण्यात आले. त्यामुळे या अर्थसंकल्पात किती वाढ होईल याकडे लक्ष लागले आहे.
स्थायी समितीने मंजूर केलेला ८४४ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प मंजुरीसाठी महासभेपुढे १७ जुलै रोजी ठेवण्यात आला होता. महापौर दीक्षा धबाले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत प्रारंभी शहरातील पाणीटंचाईवर प्रशासनाला धारेवर धरण्यात आले. टँकर नेमके कुठे जात आहेत? अशी विचारणा करण्यात आली. शहरात पाणीपुरवठाच होत नाही तर पूर्ण पाणीपट्टी कशाला? असा सवाल करत पाणीपट्टीत ५० टक्के कपात करण्याची मागणी बापूराव गजभारे यांनी केली. स्थायी समितीने प्रशासनाने सादर केलेल्या ७३२ कोटी ७५ लाखांच्या अर्थसंकल्पात तब्बल १११ कोटी २८ लाख रुपयांची वाढ करत तो अर्थसंकल्प मंजूर केला आहे. ही वाढ करताना उत्पन्नाचे कोणते स्त्रोत आहे याचा उल्लेख केला नसल्याची बाब दीपकसिंह रावत यांनी निदर्शनास आणून दिली. सभापतीच्या अर्थसंकल्पीय मनोगतात नांदेडचे खा. प्रताप पाटील चिखलीकर यांचे नाव नसल्याबाबत सभापती व सत्ताधाऱ्यांचा रावत यांनी निषेध केला. जुन्या नांदेडातील हैदरबाग येथील महापालिका रुग्णालयातील असुविधेचा विषय आर्सिया कौसर, शेर अली, अब्दुल सत्तार आदींनी मांडला. या ठिकाणी सोनोग्राफीची मशीन उपलब्ध नसल्याने रुग्णांना विष्णूपुरी येथील शासकीय रुग्णालयात पाठविले जात आहे. यामध्ये गरोदर मातांची हेळसांड होत असल्याचे कौसर यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. केळी मार्केट येथील दुकाने भाड्याने देण्याचा मुद्दाही चांगलाच गाजला. थेट नगरसेवकच हे गाळे घेऊन आपल्या नातेवाईकांना देत असल्याचा आरोप करण्यात आला. यावेळी ते नगरसेवक कोण ? असा प्रश्न सभागृहात विचारण्यात आला.
तथागत गौतम बुद्धांचा पुतळा तसेच इतर पुतळ्यांसाठी एक कोटींची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. हे निदर्शनास आणून देताना गौतम बुद्धांचा पुतळा नेमका कोणत्या जागी बसणार आहे? असा प्रश्न गजभारे यांनी उपस्थित केला असता प्रशासनाला या विषयाचे नेमके उत्तर देता आले नाही. याच मुद्यावर उमेश चव्हाण, सभागृह नेता विरेंद्रसिंघ गाडीवाले, दुष्यंत सोनाळे यांनीही चर्चा केली. गौतम बुद्धांचा पुतळा हा अपुºया जागेत न बसविता डंकीन परिसरात असलेल्या किमान दोन एकर जागेवर बसवावा, अशी मागणी गजभारे यांनी केली.
उत्पन्नवाढीसाठी महापालिकेने कोणत्याही उपाययोजना केल्या नाहीत हे सांगताना शहरात व्यवसायधारक परवाना महापालिकेने देवून व्यापाऱ्यांकडून कर वसूल करावा, अशी मागणी उमेश चव्हाण यांनी केली.
अर्थसंकल्पात जुन्या नांदेडला दुर्लक्षित केल्याचा आरोप माजी महापौर अब्दुल सत्तार यांनी केला. जुन्या नांदेडच्या विकासासाठी निधी द्यावा, अशी मागणी त्यांनी केली. नवीन नांदेडमधील मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी वाढीव निधीची गरज असल्याचे माजी उपमहापौर विनय पाटील गिरडे यांनी सांगितले.
सभागृह नेता विरेंद्रसिंघ गाडीवाले यांनी शंकरराव चव्हाण जन्मशताब्दी वर्षानिमित्त महापालिकेच्या वतीने विविध कार्यक्रम घेण्याची सूचना केली. त्याचवेळी श्री गुरुनानक देवजी यांच्या ५५० व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम तसेच शहरात येणा-या यात्रेकरुंना मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी निधी ठेवण्याची सूचनाही त्यांनी केली. महापालिका कर्मचा-यांना सातवा वेतन आयोग लागू करताना महापालिका २४ कोटींचा भार सहन करु शकेल का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
वार्षिक देखभाल दुरुस्ती निविदांच्या विषयात काही अधिकारी हस्तक्षेप करीत असून या अधिका-यांना बाजूला ठेवा, असा सल्ला गाडीवाले यांनी आयुक्तांना दिला. जनतेची कामे गतीने होण्यासाठी प्रभागनिहाय निविदा काढाव्यात, अशी मागणीही त्यांनी केली. उत्पन्नवाढीसाठी अनधिकृत बांधकाम नियमित करावेत. त्याद्वारे उत्पन्नात वाढ होईल, असेही यावेळी सदस्यांनी सुचविले.
यावेळी विरोधी पक्षनेता गुरुप्रीतकौर सोढी, किशोर स्वामी, मसूद खान, जयश्री पावडे, दीपाली मोरे, महेश कनकदंडे, साबेर चाऊस, राजू काळे, अमित तेहरा, उपायुक्त अजितपाल संधू, विलास भोसीकर, आदींची उपस्थिती होती.
मुंबईला गेले की देशमुख निधी आणायचे

  • तत्कालीन आयुक्त गणेश देशमुख यांच्या कारभाराची प्रशंसा करताना आनंद चव्हाण यांनी देशमुख हे मुंबईला गेले की कोणता ना कोणता निधी आणायचे. आपणही पुण्याला न थांबता मुंबईला राहून शहरासाठी निधी आणा, असा सल्ला चव्हाण यांनी आयुक्त माळी यांना दिला. अब्दुल सत्तार यांनीही देशमुख यांच्या कार्यकाळात हैदरबाग येथील रुग्णालय सुरु झाल्याचे सांगताना आता या रुग्णालयाची देखभाल करणेही शक्य होत नसल्याचे सांगितले.
  • शहरात वार्षिक देखभाल दुरुस्तीची कामे ही प्रभागनिहाय काढावीत, अशी मागणी शमीम अब्दुल्ला यांनी केली. किरकोळ कामे आठ-आठ दिवस होत नाहीत. अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. आयुक्त, उपायुक्त हे अधिकारी बाहेरुन येतात आणि जातात. पण स्थानिक अधिकाºयांनी महापालिकेच्या उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करावेत. ‘गाव अपना लोग अपने’ असे म्हणत स्थानिक अधिकाºयांच्या कामाची त्यांनी प्रशंसा केली. त्याचवेळी सहायक आयुक्त गीता ठाकरे यांचा पाणीपुरवठा विभागाचा पदभार त्वरित द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.
  • शहरात अनेक भागांत ड्रेनेजचे चेंबर्स उघडे आहेत. या उघड्या चेंबरवर झाकण बसविण्याची मागणी अनेक नगरसेवकांनी केली आहे. मात्र आर्थिक परिस्थितीमुळे ही कामे गतीने होत नाहीत. शिवाजीनगर प्रभागातील नागनाथ गड्डम यांनी प्रभागातील एका चेंबरवर झाकण बसविण्याची मागणी केली. मात्र या ना त्या कारणामुळे ते काम झालेच नाही. बुधवारी सभेत हा विषय येताच संतप्त झालेल्या गड्डम यांनी अधिकाºयांना धारेवर धरले. इतर नगरसेवकांनीही त्यांच्या सुरात सूर मिसळला.

Web Title: No announcement or no increase in the budget

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.