नांदेड : शहरात गेल्या काही वर्र्षांत दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे़ वेगवेगळ्या प्रकारच्या एअर हॉर्नच्या वापरामुळे प्रदूषणामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे़ त्यामुळे नांदेड शहरात १ जूनपासून दर सोमवारी ‘नो हॉर्न डे’ पाळण्यात येणार आहे़ जिल्ह्यातील नागरिकांनी हे अभियान यशस्वी करावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीना यांनी केले आहे़
नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या वतीने २४ एप्रिल २०१७ पासून दर सोमवारी नो हॉर्न डे पाळण्यात येतो़ या संकल्पनेला नाशिककरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे़ ध्वनी प्रदूषण कमी करण्यासाठी पोलीस वाहनचालक यांच्या प्रतिसादाने नाशिक शहरात हे अभियान यशस्वीपणे राबविले जात आहेत़ इतर पोलीस आयुक्त कार्यालये व ग्रामीण पोलिसांनीही ही संकल्पना राबवून ध्वनी प्रदूषणाच्या दुष्परिणामाबाबत जनतेला प्रोत्साहित करावे असे आदेश गृहराज्यमंत्र्यांनी दिले आहेत़ ही संकल्पना प्रत्येक शहरात राबविल्यास मोठ्या प्रमाणात जनजागृती होऊन वाहनचालकांवर त्याबाबत अधिकाधिक जागृती करता येणार आहे़
नांदेड शहरात वाहनांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या आधुनिक एअर हॉर्न वापरामुळे ध्वनी प्रदूषणात मोठी वाढ झाली आहे़ सायलन्स झोन आणि नो हॉर्न झोन यासारख्या संकल्पनांना शहरात सर्रासपणे हरताळ फासण्यात येतो़ ज्या ठिकाणी सायलन्स झोन होते त्या ठिकाणी कुठेच असा उल्लेखही दिसून येत नाही़ त्यामुळे याबाबत आता पोलीस दलाने पुढाकार घेतला आहे़ १ जूनपासून दर सोमवारी नांदेडात ‘नो हॉर्न डे’ पाळण्यात येणार आहे़ त्यासाठी सर्व ठाणे प्रमुखांना सूचना देण्यात आल्या आहेत़ ध्वनी प्रदूषणाबाबत पोलिसांकडून जनजागृतीही करण्यात येणार असून नागरिकांनीही अभियान यशस्वी करण्याचे आवाहन मीना यांनी केले.