- विशाल सोनटक्के
नांदेड : कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्याचा कल नेमका कुणीकडे आहे. त्याच्यामध्ये काय क्षमता आहे. हे मुलाबरोबरच पालकांनाही समजणे आवश्यक आहे. या हेतूनेच मार्च २०२० मध्ये इयत्ता दहावी बोर्ड परीक्षेस बसणाऱ्या विद्यार्थ्यांची कल व अभिक्षमता चाचणी यंदा प्रथमच घेण्यात आली. या परीक्षेला मराठवाड्यासह राज्यभरातून विक्रमी प्रतिसाद मिळाला. मराठवाड्यातील ४२७७ शाळांतील २ लाख, ८९ हजार ४९५ तर राज्यातील २२४१८ शाळांतील १५ लाख ६७ हजार ६८९ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. अशा पध्दतीची कल व अभिक्षमता चाचणी घेणारे महाराष्टÑ हे देशातील एकमेव राज्य ठरले आहे.
इयत्ता दहावी परीक्षेच्या निकालानंतर विद्यार्थ्यांसह अनेक पालकही पुढील अभ्यासक्रम तसेच करिअर क्षेत्र निवडताना गोंधळलेले दिसतात. विद्यार्थ्याची आवड, त्याचा कल न पाहताच विविध कारणांमुळे भलत्याच क्षेत्रात प्रवेश घेतल्या जातो. तर काहीवेळा पालक आपल्या अपुऱ्या इच्छा, आकांक्षा पाल्यावर लादत त्याची आवड नसलेल्या क्षेत्रात त्याला प्रवेश देतात. पर्यायाने उच्चशिक्षण घेताना चुकीच्या क्षेत्रात आल्याची जाणीव होवून अनेक विद्यार्थ्यांची मानसिक, भावनिक तसेच शैक्षणिक कोंडी होते. कालांतराने चुकीचे क्षेत्र निवडल्याचा विद्यार्थ्यासह पालकांनाही पश्चाताप होतो. मात्र, ही चूक लक्षात येते तेव्हा वेळ, पैसा आणि विद्यार्थ्याचे वयही निघून गेलेले असते. हा प्रकार टाळण्यासाठीच यंदा शिक्षण विभागाच्या पुढाकाराने विद्या प्राधिकरण आणि श्यामची आई फाऊंडेशन पुणे यांच्या वतीने २७ डिसेंबर ते १८ जानेवारी या कालावधीत मोबाईल व संगणकाद्वारे मार्च २०२० मध्ये इयत्ता दहावी बोर्ड परीक्षेस बसणाऱ्या राज्यातील सर्व विद्यार्थ्यांची चाचणी घेण्यात आली.
मराठवाड्यातून या परीक्षेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील ४२७७ शाळांतील २ लाख ८९ हजार ४४५ विद्यार्थ्यांनी मोबाईल व संगणकाद्वारे ही चाचणी दिली. यात बीड जिल्ह्यातील ६३९ शाळांतील ४२,५४१, हिंगोली जिल्ह्यातील २१० शाळांतील १६,२१६, जालना जिल्ह्यातील ६४४ शाळांतील ३९,७०९, लातूर जिल्ह्यातील ६४४ शाळांतील ३९,७०९, उस्मानाबाद जिल्ह्यातील ४२४ शाळांतील २१,९६३, औरंगाबाद जिल्ह्यातील ८६० शाळांतील ६३,३२७, परभणी जिल्ह्यातील ४१९ शाळांतील २८,२५० तर नांदेड जिल्ह्यातील ६८७ शाळांतील ४५ हजार ३३१ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली.
या चाचणीत कृषी क्षेत्रातील उद्यानविद्या, कृषी व जैवतंत्रज्ञान आणि पशुसंवर्धन, कला व मानव्यविद्या क्षेत्रातील इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, मानसशास्त्र, तत्त्वज्ञान व साहित्य, वाणिज्य क्षेत्रातील बँकींग टॅक्सेशन, अकाऊंटिंग, पर्चेस अॅण्ड सेल रिटेल मॅनेजमेंट, ललित कलाक्षेत्रातील दृश्यकला, प्रयोगजीवी कला, उपयोजित कला, फिल्म मेकिंग, छायाचित्रण, संगीत, नृत्य, आर्किटेक्ट, अॅनिमेशन, मल्टीमीडिया, आरोग्य व जैविक विज्ञान या क्षेत्रांतील वैद्यकीय, नर्सिंग, फार्मसी, पॅरामेडिकल, फिटनेस ट्रेनिंग, योगा, न्यूट्रिशियन, तांत्रिक क्षेत्रांतील मोबाईल ते मंगळयान अशा विविध तंत्रज्ञानाबद्दल सर्वसाधारण माहिती याबरोबरच गणवेशधारी क्षेत्रातील संरक्षण, निमलष्करी दल, केंद्र व राज्य पोलीस दल, नागरी संरक्षण दल आदी सात क्षेत्रांतील कलमापन करण्यात आले. याबरोबरच विद्यार्थ्यांच्या भाषिक, तार्किक, अवकाशीय आणि सांख्यिकीय अशा चार क्षमतांचेही मापनही या परीक्षेद्वारे केले जाणार आहे.
दहावीच्या निकालाबरोबरच मिळणार कलचाचणीचाही निकालशिक्षण विभागाच्या पुढाकाराने मार्च २०२० मध्ये होणाऱ्या इयत्ता दहावीच्या परीक्षेस बसणाऱ्या राज्यभरातील विद्यार्थ्यांची कल अभिक्षमता चाचणी मोबाईल व संगणकाद्वारे घेण्यात आली आहे. भविष्यासाठी अत्यंत उपयोगी ठरणाऱ्या या चाचणीचा निकालही इयत्ता दहावीच्या निकालाबरोबरच विद्यार्थ्यांना दिला जाणार आहे. www.mahacareermitra.in या वेबसाईटवर तसेच maha career mitra या अॅपवर विद्यार्थ्यांनी आपल्या बोर्ड परीक्षेचा बैठक क्रमांक टाकल्यास त्यांना त्यांच्या कल व अभिक्षमता चाचणीचा निकालही मोफत पाहता येणार आहे.
करियर निवडीसाठी महत्वपूर्ण चाचणी राज्यभरातील सर्व शाळांत यंदा कल व अभिक्षमता चाचणी घेण्यात आली. शास्त्रीय पध्दतीने ही चाचणी घेतल्याने चाचणीची अचूकता व उपयुक्तता वाढली आहे. विशेष म्हणजे, या चाचणीसाठी विद्यार्थ्यांना कोणताही वेगळा अभ्यास करावा लागला नाही. या चाचणीद्वारे विद्यार्थ्यांचा कोणत्या क्षेत्राकडे कल आहे ते स्पष्ट होणार आहे. याबरोबरच विद्यार्थ्याला आवड असलेल्या क्षेत्रात आवश्यक असलेल्या क्षमता कितपत आहेत, याचीही माहिती या चाचणीद्वारे मिळणार असल्याने इयत्ता दहावीनंतरचे करिअर क्षेत्र निवडण्यासाठी ही चाचणी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.- बालासाहेब कच्छवे, विभागीय समुपदेशक, कल व अभिक्षमता चाचणी, लातूर बोर्ड
राज्यातील ९८.८९ टक्के विद्यार्थ्यांनी दिली कलचाचणीविभाग एकूण शाळा सहभागी शाळा परीक्षार्थी टक्केअमरावती २७०२ २५९३ १६७२९९ ९९.००औरंगाबाद २५६५ २५२२ १८२४४१ ९८.००कोकण ६४३ ६४१ ३३६५४ ९९.००कोल्हापूर २३३९ २२७८ १३३७४२ ९९.००लातूर १८०५ १७५५ १०७००४ ९८.००मुंबई ४०५८ ३७५१ ३२९४४५ ९८.००नागपूर २८०८ २६६६ १६१०७८ ९९.००नाशिक २७९६ २७१६ १९७९१२ ९९.००पुणे ३६२२ ३४९६ २५५११४ ९८.००एकूण २३३३८ २२४१८ १५,६७,६८९ ९८.८९