वीज ग्राहकांकडे दीड कोटीची थकबाकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2019 12:27 AM2019-05-31T00:27:31+5:302019-05-31T00:28:49+5:30
तालुका दुष्काळाने होरपळून निघत आहे. दुष्काळी मदत, पीक वीमा रक्कम हाती नाही, खरीप पेरणीपूर्व कामाची लगीनघाई चालू आहे. त्यात घरगुतीसह इतर ग्राहकाकडे १ कोटी ५५ लाखापेक्षा अधिक थकबाकी असल्याचे समोर आले आहे. थकबाकी वसुलीसाठी महावितरणच्या तगाद्याला तोंड कसे द्यायचे? याची चिंता ऐन दुष्काळात थकबाकीदार ग्राहकांना सतावत असल्याचे चित्र आहे.
कंधार : तालुका दुष्काळाने होरपळून निघत आहे. दुष्काळी मदत, पीक वीमा रक्कम हाती नाही, खरीप पेरणीपूर्व कामाची लगीनघाई चालू आहे. त्यात घरगुतीसह इतर ग्राहकाकडे १ कोटी ५५ लाखापेक्षा अधिक थकबाकी असल्याचे समोर आले आहे. थकबाकी वसुलीसाठी महावितरणच्या तगाद्याला तोंड कसे द्यायचे? याची चिंता ऐन दुष्काळात थकबाकीदार ग्राहकांना सतावत असल्याचे चित्र आहे.
तालुक्यात कंधार शहर, कंधार ग्रामीण, कुरूळा, बारूळ, पेठवडज या पी. सी. अंतर्गत घरगुती ग्राहक संख्या सुमारे २३ हजार आहे. कमर्शियल व औद्योगिक ग्राहक सुमारे ४०० पेक्षा जास्त आहे.
आजघडीला विद्युत पुरवठा अत्यावश्यक बाब झाली आहे. ब्लब, फॅन, टीव्ही, मिक्सर, हिटर, टयुब, मोबाईल चार्जिंग, अभ्यास आदीसाठी वीज आवश्यक आहे. तसेच औद्योगिक व व्यावसायिकांना आपल्या उत्पादन व सेवेसाठी वीज उपयुक्त असते.
वीजपुरवठा खंडीत झाला तर सर्वांची कोंडी होती. ऐन उन्हाळ्यात तर उपकरण बंद असेल तर कुटुंबातील सदस्यांचा जीव कासावीस होतो. एवढे वीजेचे महत्त्व वाढले आहे. परीक्षा काळात वीज पुरवठा खंडीत झाला तर गुणवत्तेवर परीणाम होतो.
विजेचे महत्त्व वाढले असतानाच बील भरणा होणे आवश्यक असते.महावितरण सुद्धा नियमित वीज भरणा केले तर सुस्थितीत राहते. अन्यथा डबघाईला येण्याचा धोका वाढतो. त्यामुळे ग्राहकाकडून वसुलीसाठी सातत्याने प्रयत्न केले जातात. वसुलीचा तगादा लावला जातो. वसुलीसाठी जनजागृती, प्रबोधन केले जाते. सर्व प्रयत्न करूनही बील भरणा होत नसेल तर वीज पुरवठा खंडीत केला जातो. मग थकबाकीदार ग्राहकांना विविध समस्येला सामोरे जावे लागते. आता तर तालुक्यात दुष्काळी चित्र असल्याने शेतकरी, कामगार यांना वीज बील भरणा कसा करावा याची चिंता सतावत आहे.
तालुक्यातील १० हजारापेक्षा अधिक घरगुती ग्राहकाकडे सुमारे १ कोटी ५० लाख थकबाकी आहे. तसेच व्यावसायिक व औद्योगिक ग्राहकही शेकडयात थकबाकीदार आहेत.दुष्काळाने व्यवसाय व उद्योग उलाढाल मंदावली आहे. त्यामुळे या ग्राहकांना सुद्धा बील भरणा करणे अडचणीचे झाले आहे. वसुलीसाठी महावितरणचे अधिकारी कर्मचारी कधी येणार ? बील भरणा केला नाही तर वीज पुरवठा खंडीत होईल या चिंतेने थकबाकीदार ग्राहकांना ग्रासले आहे.
अत्यल्प पावसाने पीक उतारा घटला
तालुका खरीप हंगामाचा म्हणून ओळखला जातो. सतत निसर्ग पावसाचा लपंडाव चालू असल्याने शेती व्यवसाय अडचणीत आला आहे. अत्याल्प पावसाने पीक उतारा घटला. खर्च अधिक व उत्पादन कमी अशी गत झाली. कमी पीक आणेवारीमुळे दुष्काळ जाहीर झाला. परंतु दुष्काळी अनुदान, पीक वीमा अद्याप हाती आले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचा खिसा रिकामा आहे. त्यामुळे आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत असताना बील भरणा करण्याची चिंता सतावत आहे.
घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक ग्राहकाकडे दीड कोटीपेक्षा अधिक थकबाकी आहे. ग्राहकात व थकबाकीदार ग्राहकात जनजागृती करून वसूलीचा प्रयत्न सतत केला जातो. सर्व पी.सी.अंतर्गत अधिकारी, कर्मचारी यांना वसुलीसाठीचे निर्देश सातत्याने दिले जातात. त्यानुसार सर्व पीसी अंतर्गत वसुली केली जाते
- महेश वाघमारे (उपकार्यकारी अभियंता महावितरण) कंधार