नांदेडात गेल्या काही दिवसात दररोज दाेनशेहून अधिक बाधित आढळून येत आहेत. त्यामुळे प्रशासनाने शनिवारपासून जिल्ह्यात अंशता लॉकडाऊन लागू केला आहे. तसेच तपासण्यांचा वेगही वाढविण्यात आला आहे. लसीकरणालाही सुरुवात झाली असून ६० वर्षावरील आणि ४५ वर्ष वय असलेल्या इतर आजाराच्या रुग्णांना लस देण्यात येत आहे. जिल्ह्यात २२ शासकीय आणि काही खाजगी रुग्णालयात ही सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. परंतु जिल्हा रुग्णालयात दररोज पहिल्या टप्प्यासाठी शंभर आणि दुसऱ्या टप्प्यासाठी शंभर अशा प्रकारे दोनशे जणांनाच लस देण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. यापूर्वी याठिकाणी अडीचशेहून अधिक जणांना लस दिली जात होती. लस देण्यासाठी या ठिकाणी टाेकन पद्धत अवलंबिण्यात आली आहे. त्यामुळे टोकन संपल्यानंतर लसीकरणासाठी आलेल्यांना लस न घेताना माघारी परत जावे लागत आहे. या प्रकारामुळे लसीकरणाच्या वेगालाच खो देण्यात येत आहे. त्यामुळे या ठिकाणचे लसीकरणाचे उद्दिष्ट वाढवून देण्याची गरज आहे. तरच कमी वेळेत सर्वांना लस मिळेल.
दररोज होते उद्दिष्ट पूर्ण
जिल्हा रुग्णालयात पहिल्या डोससाठी शंभर आणि दुसऱ्या डोससाठी शंभर अशा दोनशे जणांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. पहिल्या डोससाठी शंभर जण न आल्यास ते टोकन दुसऱ्या डोससाठी आलेल्यांना देण्यात येते. काही जण टोकन घेऊन जातात अन् परत येतच नाहीत असेही दिसून आले. तसेच इतर ठिकाणीही लसीकरण आता सुरु झाले आहे. त्यामुळे शक्यतो लस न घेता कुणी माघारी जात नसल्याची प्रतिक्रिया अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सिरसीकर यांनी दिली.