कुटुंबातील सदस्यांचीच तपासणी केली जात असल्याचे काही प्रकरणांतून पुढे आले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेली निकटची मित्रमंडळी, नातेवाईक तसेच कुटुंबातील सदस्यांचा तातडीने शोध घेऊन त्यांच्या तपासण्या करण्याची गरज असते. ही प्रक्रिया कमीत कमी वेळेत पूर्ण झाल्यास कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यास मदत मिळते. बाधित व्यक्तीच्या संपर्कातील लोकांच्या तपासण्या करून गरजेनुसार त्यांना अलग केले जाते. तसेच आणखी बाधित निघाल्यास त्यांच्यावर तातडीने उपचारही सुरू केले जातात. मात्र कोरोना तपासणीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर केवळ कुटुंबातील सदस्यांचीच तपासणी केली जात असल्याची प्रकरणे पुढे येत असल्याने कोरोना प्रादुर्भाव वाढण्याचीच भीती व्यक्त केली जात आहे. नांदेड आरोग्य विभागाच्या दाव्यानुसार एखाद्या व्यक्तीचा अहवाल बाधित आल्याचे आढळल्यानंतर त्या व्यक्तीच्या संपर्कातील जवळपास २० व्यक्तींची पथकामार्फत चौकशी करून त्यांची तपासणी करण्यात येते. मात्र प्रशासनाचा हा दावा काही प्रकरणांत खोटा ठरत असल्याचे पुढे आले आहे. सिडको भागातीलच एकाचा अहवाल बाधित आल्यानंतर दुसऱ्या दिवशी आरोग्य विभागाचे पथक या रुग्णाच्या घरी पाेहोचले. तेथे कुटुंबीयांना तपासणीसाठी सांगून हे पथक माघारी फिरले. अशा परिस्थितीत कोरोना नियंत्रणात कसा येणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
केस-१
शहरातील शिवाजीनगर भागातील एकाचा अहवाल बाधित असल्याचे आढळल्यानंतर आरोग्य विभागाच्या पथकाने रुग्णाच्या घरी भेट देऊन कुटुंबीयांची तपासणी करण्यास सांगितले. तशी तपासणीही करण्यात आली. मात्र कुटुंबाव्यतिरिक्त संपर्कात आलेल्या इतर व्यक्तींचा शोध घेण्याचे कष्ट पथकाने घेतले नाहीत.
केस-२
सिडकोमध्येही असाच अनुभव आल्याचे बाधिताच्या नातेवाइकांनी सांगितले. तपासणी अहवाल प्राप्त झाल्यानंतर पथक दुसऱ्या दिवशी घरी आले. तोपर्यंत कुटुंबातील सदस्य आहे त्या स्थितीत पथकाची वाट पाहत राहिले. या कुटुंबातील सदस्यांव्यतिरिक्त इतरांच्या शोध तसेच तपासणीबाबत पथक तेवढे आग्रही नव्हते.
केस-३
शहरातील छत्रपती चौक, वामननगर परिसरातही एका बाधिताच्या घरी दुसऱ्या दिवशी पथक पोहोचले. या पथकानेही केवळ कुटुंबातील सदस्यांना तपासणीसाठी पाठविले. मात्र कुटुंबाव्यतिरिक्त इतर संपर्कात आलेल्यांचा शोध घेण्यात फारसी रुची दाखविली नाही.
कोट
एखाद्याचा अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर यंत्रणा तातडीने बाधितासह कुटुंबीयांपर्यंत पोहोचण्याला प्राधान्य देते. जास्तीत जास्त कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करून तातडीने पुढील कार्यवाही करणे आणि प्रादुर्भाव आटोक्यात आणणे यासाठी यंत्रणा प्रयत्नशील आहे. सध्या नांदेडमध्ये कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे हे प्रमाण २० टक्के आहे.
- डॉ. नीळकंठ भोसीकर, जिल्हा शल्यचिकित्सक, नांदेड.