माहूर (जि़ नांदेड) : साडेतीन शक्तिपीठांपैकी एक पूर्ण पीठ असलेल्या माहूरगडावरील रेणुकामातेचे मंदिर नवरात्र उत्सव काळातही बंदच राहणार आहे़ नवरात्रौत्सव काळात केवळ पुजाऱ्यांनाच प्रवेश दिला जाणार असल्याने गडावर यंदा शुकशुकाट जाणवणार आहे़
नवरात्रोत्सव आला की, राज्यातील देवीच्या साडेतीन शक्तिपीठांकडे भाविकांचे पावले वळायला माहूर गडाकडे वळायला लागतात. राज्यातील कोल्हापूर, तुळजापूर, माहूर आणि नाशिक या ठिकाणी देवीची साडेतीन पीठं आहेत. यंदा १७ ते २६ आॅक्टोबर २०२० दरम्यान होणारा शारदीय नवरात्रोत्सव कोरोनामुळे अत्यंत साध्या पद्धतीने व भविकांविना साजरा करण्याचा निर्णय श्री रेणुकादेवी मंदिर संस्थानने घेतला आहे. त्यामुळेच नवरात्रोत्सवाच्या आदल्या दिवशीही गडावर कसलीही धामधूम तसेच रेलचेल दिसून आली नाही़ धार्मिक विधीसाठी केवळ पुजाऱ्यांनाच प्रवेश दिला जाईल. त्याव्यतिरिक्त कुणालाही प्रवेश दिला जाणार नसल्याचे मंदिर संस्थानच्या वतीने सांगण्यात आले़ परिसरातील नागरिकांना माहूर शहरात येताना आपले ओळखपत्र जवळ ठवणे बंधनकारक केले असल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी विलास जाधव यांनी सांगितले.