नांदेड : महावितरणने विष्णूपुरी प्रकल्प परिसरातील एक्स्प्रेस फिडरचा विद्युत पुरवठा बंद केल्यानंतर आता विष्णूपुरी प्रकल्पातून होणाऱ्या पाणी उपशावर काही प्रमाणात नियंत्रण आले आहे. त्याचवेळी दोन पथकांकडून गस्तही सुरू असल्याने प्रकल्पाच्या दोन्ही बाजूला असलेल्या गावातून होत असलेला अवैध पाणीउपसा थांबला आहे. परिणामी उपलब्ध जलसाठ्यातून मे अखेरपर्यंत शहराला पाणीपुरवठा करणे शक्य होणार आहे.विष्णूपुरी प्रकल्पातील पाणीपातळी झपाट्याने घटल्याने दक्षिण नांदेडातील पाणीप्रश्न ऐरणीवर आला. विष्णूपुरी प्रकल्पातून होत असलेल्या अवैध पाणी उपशावर नियंत्रण न मिळवल्याने हा पाणीप्रश्न आणखी गंभीर झाला असता. जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी तातडीने बैठक घेत अवैध उपसा रोखण्यासाठी ३ पथके तैनात करण्याचे तसेच प्रकल्प परिसरातील एक्स्प्रेस फीडरचा वीजपुरवठा खंडित करण्याचे आदेश दिले होते.या आदेशानंतर महावितरणने एक्स्प्रेस फिडरचा वीजपुरवठा बंद केला. परिणामी प्रकल्पातून होणारा अवैध पाणी उपसा काही प्रमाणात थांबला आहे. प्रकल्पाच्या दोन्ही बाजूने गस्त घातली जात आहे. त्यामुळे पूर्वी प्रतिदिन ०.३२ दलघमी होत असलेला पाणी उपसा आता ०.२६ दलघमीवर आला आहे. तापमानातही मोठी वाढ झाल्याने बाष्पीभवनाचे प्रमाण वाढले आहे. यामुळेही पाणीपातळी खालावत आहे. प्रकल्पात आजघडीला केवळ ५.७२ दलघमी जलसाठा उरला आहे. या जलसाठ्यातून मे अखेरपर्यंत पाणी पुरवठा केला जाऊ शकतो. शहराला इसापूर प्रकल्पातूनही पर्यायी पाणी पुरवठा योजनेद्वारे पाणी दिले जात आहे. आतापर्यंत इसापूर प्रकल्पातून चार पाणीपाळ्या घेण्यात आल्या आहेत. पाचवी पाणीपाळी निश्चित आहे. पाऊस लांबला तर इसापूरची आणखी एक पाणीपाळी घ्यावी लागणार आहे.आजघडीला विष्णूपुरी प्रकल्पात जवळपास ७ किलोमीटर क्षेत्रात पाणी आहे. या प्रकल्पाच्या दोन्ही बाजूला जवळपास आठ ते दहा गावे आहेत. डाव्या बाजूला पाच आणि उजव्या बाजूच्या सहा गावांमध्ये जवळपास २५० हून अधिक अनधिकृत वीजपंपाद्वारे पाणीउपसा केला जात होता. एक्स्प्रेस फिडरचा वीजपुरवठा बंद केल्याने उपसा आता थांबला आहे. त्याचवेळी शेतकरी या ना त्या मार्गाने पाणी उपसण्यास प्रयत्न करीत आहेतच. त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी दोन पथके गस्त घालत आहेत. अवैध पाणीउपसा रोखण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या एका पथकात ७ कर्मचारी आहेत. त्यात पाटबंधारे विभागाचे २, महापालिकेचे २, तहसील, महावितरण आणि पोलीस विभागाच्या प्रत्येकी एका कर्मचाºयाचा समावेश आहे.वेळीच कारवाई झाली असती तऱ़़विष्णूृपुरीतून अवैध उपसा रोखण्यासाठी जिल्हाधिकारी डोंगरे यांनी २ आॅक्टोबर २०१८ रोजी घेतलेल्या बैठकीत निर्देश दिले होते. १६ ते ३० नोव्हेंबर आणि १६ डिसेंबर २०१८ ते जुलै २०१९ पर्यंत प्रकल्प परिसरातील सर्व बागायतदारांचा वीजपुरवठा तोडण्याचे आदेश दिले होते.मात्र महावितरणने २५ एप्रिलपर्यंत वीजपुरवठा बंद केलाच नव्हता. परिणामी प्रकल्पातून पाणीउपसा सुरुच राहिला. त्यामुळे दक्षिण नांदेडवर पाण्यासाठी वणवण भटकंती करण्याची वेळ आली आहे. अनेक ठिकाणी टँकर सुरु आहेत़ पावसाळा लांबल्यास प्रश्न उद्भवणार आहेत.
विष्णूपुरीत मे अखेरपर्यंतचाच जलसाठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 06, 2019 12:47 AM