ओपन-क्लोज; वेबसाईटवर येतात मटक्याचे आकडे, रोज दोन कोटींची होते उलाढाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2020 08:00 PM2020-01-16T20:00:37+5:302020-01-16T20:03:10+5:30
नांदेड जिल्ह्यात मटक्याचे सात मुख्य बुकी
- शिवराज बिचेवार
नांदेड : शहर व जिल्ह्यात सध्या खुलेआम ओपन-क्लोजच्या आकड्यांचा खेळ सुरु आहे़ वरवर किरकोळ वाटणारा हा जुगार मात्र गेल्या काही वर्षांत कोट्यवधींच्या घरात जावून बसला आहे़ एकट्या नांदेड जिल्ह्यात दरदिवशी जवळपास दोन कोटींची उलाढाल मटक्यातून होते़ त्यामुळे अनेकांना रोजगार मिळाला असला तरी, अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत़ आकड्यांच्या या खेळात चालविणारे मात्र दिवसेंदिवस गब्बर होत चालले आहेत़
नांदेड जिल्ह्यात कल्याण आणि मिलन या दोन मटक्यांना सर्वाधिक पसंती आहे़ मटक्याचे इतरही अनेक प्रकार आहेत़ कल्याण आणि मिलनचे दिवसातून आठ वेळा भाव अर्थात आकडे येतात़ त्यात कल्याण ओपनचा पहिला आकडा दुपारी ३ वाजून ५० मिनिटांना येतो़ दुसरा क्लोज नावाचा आकडा सायंकाळी ५ वाजून १० मिनिटाला, कल्याण नाईटचा पहिला आकडा रात्री ९ वाजून १० मिनिटांना तर कल्याण नाईटचा दुसरा आकडा रात्री १२ वाजून १० मिनिटाला येतो़ तर मिलनचा पहिला ओपनचा आकडा दुपारी ३ वाजून १० मिनिटांना, दुसरा क्लोजचा आकडा ५ वाजून १० मिनिटाला, मिलन नाईट पहिला आकडा ९ वाजून १० मिनिटाला, दुसरा आकडा सव्वा अकरा वाजता येतो़ त्यामुळे या वेळेला आकडे लावणारे आणि घेणारे हे दोघेही जण सर्वाधिक व्यस्त असतात़
काही वर्षांपूर्वी इंटरनेटची सोय नव्हती़ तेव्हा हे आकडे मुख्य कार्यालय मुंबई येथून फोनवरून घेतले जायचे़ आकडा घोषित होण्याच्या वेळी मुंबईवरुन फोन येत होता़ त्या फोनवर सांगितलेला आकडाच अंतिम समजला जाई़ जुगाराच्या या प्रकारात विश्वासावरच सर्व अवलंबून आहे़ परंतु, आता इंटरनेटच्या युगात या जुगारानेही कात टाकली आहे़ आता ठरावीक वेळेत सट्टा- बट्टा नावाच्या वेबसाईटवर हे आकडे येतात़ कल्याण आणि मिलनमध्ये जर एक अंकी आकडा लागला तर १ रुपयाला ९ रुपये खेळणाऱ्याला मिळतात़ दोनअंकी आकडे लागले तर १ रुपयाला ९५ रुपये मिळतात़ या दोनअंकी आकड्यासोबत पत्तेदेखील खेळले जातात़ तीनअंकी साधी पाने लागले तर १ रूपयाला १४० रुपये आणि मेट्रो पत्ते अर्थात तीन अंकात एखादा आकडा डबल जसे ३४४ असे लागले तर या मेट्रो आकड्याला १ रुपयाला २८० रुपये मिळतात़
नांदेड जिल्ह्यात मटका चालविणारे मुख्य सात बुकी आहेत़ हेच सात जण वेगवेगळ्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत मटका चालवतात़ आकडे घेणाऱ्याला बिटर असे म्हटले जाते़ हे बिटर टक्केवारीवर किंवा ५०० रुपये मजुरीवर दररोज आकडे घेतात़ भाव येण्यापूर्वी १० ते १५ मिनिटांपूर्वी पूर्ण पट्टी म्हणजे घेतलेल्या आकड्याची यादी आणि एकूण रक्कम हे बिटर आपल्या सेठला कळवितात.
या सात बुकींच्या वर वरिष्ठ सूत्रधार आहेत़ त्यांना हे शेठ लोक ठरावीक वेळेत आकडे आणि रक्कम कळवितात़ शिवाय हे शेठ लोक आपल्या ऐपतीनुसार काही रक्कम आपल्याजवळ ठेऊन घेतात़ जसे १०० रुपये जमा झाले असतील तर त्यापैकी ८० रुपये वरच्या शेठला कळविले जातात़ त्यात फायदा किंवा नुकसान त्या-त्या शेठचे असते़ नांदेडच्या सूत्रधारांचे कनेक्शन औरंगाबाद, पुणे, मुबंईचे मुख्य बुकी आणि त्यांनी नेमलेल्या वेगवेगळ्या जिल्ह्यातील बुकीसोबत आहेत़
३४ देशांत खेळला जातो मुंबई मटका
पूर्वी मुंबई नावाचा प्रसिद्ध मटका खेळला जात होता़ पण मुंबई मटक्याच्या बुकीवर कारवाई झाल्याने मागील पाच महिन्यांपासून नांदेड जिल्ह्यात मुबंई नावाचा मटका बंद आहे़ त्यामुळे मुंबई मटका लावणारे आता कल्याण-मिलनकडे वळले आहेत़ मुंबई मटक्याचे वैशिष्ट्य म्हणजे, भारतासह जगभरातील ३४ देशांत मुबंई मटका खेळला जातो़दरम्यान, बुकीकडून जुगाऱ्यांना आकर्षित करण्यासाठी आकडा लागल्यानंतरच्या दिल्या जाणाऱ्या रकमेत वाढ करण्यात येते़ एक अंकी आकडा लागल्यास इतर बुकी नऊ रुपये देतो़ तर त्याचा प्रतिस्पर्धी दहा रुपये देण्यास तयार होतो़ यातून मोठी स्पर्धा निर्माण होते़