नांदेड : प्रवाशांच्या सुविधेसाठी दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातून आणखी दोन विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या दोन्ही रेल्वे संपूर्ण आरक्षित असून, अनारक्षित प्रवाशांना या गाडीमध्ये प्रवेश मिळणार नाही.
गाडी संख्या ०८५०५ विशाखापट्टणम श्री साईनगर शिर्डी साप्ताहिक विशाखापट्टणम येथून दर गुरुवारी १४ जानेवारीपासून, तर गाडी संख्या ०८५०६ श्री साईनगर शिर्डी विशाखापट्टणम साप्ताहिक गाडी श्रीसाईनगर शिर्डी येथून दर शुक्रवारी १५ जानेवारीपासून चालविण्यात येणार आहे. ही गाडी विशाखापट्टणम येथून सुटून राजमुंद्री, विजयवाडा, काझीपेठ, सिकंदराबाद, निझामाबाद, नांदेड, परभणी, औरंगाबाद, मनमाडमार्गे श्री साईनगर शिर्डीला पोहोचेल. या गाडीस २१ डबे असतील.
त्याचबरोबर गाडी संख्या ०२०८५ संबलपूर नांदेड ही साप्ताहिक संबलपूर येथून दर सोमवारी, शुक्रवारी आणि रविवारी १५ जानेवारीपासून धावेल. तसेच गाडी संख्या ०२०८६ नांदेड संबलपूर ही साप्ताहिक नांदेड येथून दर मंगळवारी, शनिवारी आणि सोमवारी १६ जानेवारीपासून चालविण्यात येणार आहे. ही गाडी संबलपूर येथून सुटून रायगड, विशाखापट्टणम, राजमुंद्री, रायानपाडू, काझीपेत, सिकंदराबाद, निझामाबादमार्गे नांदेड येथे पोहोचेल. या गाडीस १८ डबे असतील. या दोन्ही विशेष गाड्यांचे वेळापत्रक रेल्वेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे.