श्रीक्षेत्र माहूर : माहूर नगर -पंचायतच्या नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शीतल जाधव तर उपनगराध्यक्षपदी काँग्रेसच्या अश्विनी तुपदाळे यांची निवड झाली़ ईश्वरचिठ्ठीने नगराध्यक्ष, उपाध्यक्ष पदाची निवड करण्यात आली़विद्यमान नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांचा अडीच वर्षांचा कार्यकाळ संपल्याने ही निवडणूक घेण्यात आली़ नगराध्यक्षपद मागास प्रवर्गातील महिलांसाठी राखीव होते़ या पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शीतल जाधव, भाजपातर्फे दीपाली लाड यांनी अर्ज दाखल केला होता़ नगरपंचायतीवर सत्ता स्थापन करण्यासाठी शिवसेनेने फोडा आणि झोडा नीतीचा अवलंब करत काँग्रेस, राष्ट्रवादी व एमआयएमचा प्रत्येकी एक नगरसेवक असे तीन नगरसेवकांना फोडण्यात यश मिळविले़ त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीकडे ८ तर भाजपा-शिवसेनेकडेही ८ नगरसेवक झाल्याने ईश्वरचिठ्ठीने नगराध्यक्षपदाची निवडणूक घेण्याचे ठरवण्यात आले़ यात शीतल जाधव यांची चिठ्ठी निघाल्याने त्यांची नगराध्यक्ष म्हणून निवड झाली़ उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीतही तेच घडले आणि ईश्वरचिठ्ठीने अश्विनी आनंद तुपदाळे यांची निवड झाली़ पिठासीन अधिकारी म्हणून सहाय्यक जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी काम पाहिले़ त्यांना माहूरचे तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर, मुख्याधिकारी विद्या कदम यांनी सहकार्य केले़ऐन निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस, राष्ट्रवादी व एमआयएमच्या प्रत्येकी एका नगरसेवकाने शिवसेनेशी कास धरली तरी ईश्वरचिठ्ठीतून राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस नगरसेवकांची नावे निघाली़ नगर पंचायतीमध्ये भाजपा-सेनेची सत्ता ईश्वरलाही मान्य नव्हती, अशी चर्चा यानंतर माहूर शहरात सुरू झाली़ राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आ़ प्रदीप नाईक, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष दिनकर दहीफळे, काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष प्रा़ राजेंद्र केशवे, विशाल जाधव यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती़ निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व एमआयएमच्या नगरसेवकाला नागरिकांनी निवडून दिले असले तरीही ऐन नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत या तिघांनी शिवसेनेशी कास धरल्याने मतदारांचा अपेक्षाभंग झाला असे म्हटले जात आहे़ शिवसेनेचे ज्योतिबा खराटे, भाजपाचे अॅड़रमण जायभाये, सुमित राठोड यांनी प्रयत्न करूनही त्यांच्या पदरी निराशा पडली़
ईश्वरचिठ्ठीने आली काँग्रेस-राष्ट्रवादीची माहूरमध्ये सत्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2019 12:41 AM
माहूर नगर -पंचायतच्या नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शीतल जाधव तर उपनगराध्यक्षपदी काँग्रेसच्या अश्विनी तुपदाळे यांची निवड झाली़ ईश्वरचिठ्ठीने नगराध्यक्ष, उपाध्यक्ष पदाची निवड करण्यात आली़
ठळक मुद्देनगराध्यक्षपदी शीतल जाधव उपनगराध्यक्षपदी काँग्रेसच्या अश्विनी तुपदाळे