‘ग्रंथोत्सवातून वाचन संस्कृतीची जोपासना’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2018 11:53 PM2018-12-08T23:53:52+5:302018-12-08T23:54:20+5:30

पुस्तक वाचनातून वाचनाची आवड निर्माण झाली पाहिजे. यातून समाज सुसंस्कृत होत जातो, यासाठी ग्रंथोत्सवासारखे उपक्रम महत्त्वाचे ठरतात, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केले.

To preserve reading culture from 'Granthotsav' | ‘ग्रंथोत्सवातून वाचन संस्कृतीची जोपासना’

‘ग्रंथोत्सवातून वाचन संस्कृतीची जोपासना’

googlenewsNext

नांदेड : पुस्तक वाचनातून वाचनाची आवड निर्माण झाली पाहिजे. यातून समाज सुसंस्कृत होत जातो, यासाठी ग्रंथोत्सवासारखे उपक्रम महत्त्वाचे ठरतात, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केले.
उच्च व तंत्रशिक्षण विभाग ग्रंथालय संचालनालय व जिल्हा ग्रंथालय नांदेड यांच्यावतीने आयोजित ग्रंथोत्सवाचे उद्घाटन जिल्हाधिकारी डोंगरे यांच्या हस्ते झाले़ त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा ग्रंथालयाचे अध्यक्ष माजी आमदार अ‍ॅड़ गंगाधर पटणे हे होते. तर विभागीय सहनिबंधक तथा साहित्य अकादमी पुरस्कारविजेते साहित्यिक श्रीकांत देशमुख, जिल्हा माहिती अधिकारी अनिल आलूरकर, औरंगाबादचे सहाय्यक ग्रंथालय संचालक सुनील हुसे, उच्च शिक्षण विभागाचे वरिष्ठ लेखाधिकारी नीळकंठ पांचगे, जि़ प़ चे माजी अध्यक्ष संभाजीराव धुळगुंडे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी आशिष ढोक, सेवानिवृत्त जिल्हा माहिती अधिकारी रामचंद्र देठे, माजी नगराध्यक्ष प्रतापराव देशमुख, ग्रंथालय चळवळीचे बी. जी. देशमुख, प्रकाशक निर्मलकुमार सूर्यवंशी आदींची प्रमुख उपस्थिती होती. जिल्हाधिकारी डोंगरे म्हणाले, नवीन पिढीचे समाजमाध्यमांवरील वाचन वाढले आहे, अशावेळी पुस्तक वाचनाला विसरुन चालणार नाही. वाचनातील आकलन करुन ते कृतीत विचार आले पाहिज़े
‘उज्ज्वल नांदेड’ या उपक्रमात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची डोंगरे यांनी यावेळी माहिती दिली. पुस्तक वाचनातून स्पर्धा परीक्षा देणाºया अनेक विद्यार्थ्यांचे आयुष्य घडले आहे. त्यांनी शिक्षण घेतलेल्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी पुस्तके देवून त्यांना उज्ज्वल जीवनाकडे नेण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन डोंगरे यांनी केले़
माजी आमदार अ‍ॅड़ पटणे म्हणाले, अवांतर वाचनाची आवड लहानवयातून झाली तर कोणत्याही क्षेत्रात त्यांना सहज यश मिळते. नांदेड ग्रंथोत्सवात विविध दालनांत उपयुक्त ग्रंथ उपलब्ध आहेत. ते खरेदी करुन वाचली पाहिजे,असे आवाहन करताना नांदेड महानगरपालिकेने त्यांच्या राममनोहर लोहिया सार्वजनिक वाचनालयाची नवीन इमारत वाचकांसाठी लवकर उभी करावी, अशी मागणी केली.
विभागीय सहनिबंधक श्रीकांत देशमुख म्हणाले, ग्रंथवाचनातून विचार करण्याची क्षमता वाढते. अनेक समाजसुधारकांनी ज्ञानातून समाज घडविला. आधुनिक भारत ज्ञानातून घडत आहे. अनावश्यक खर्च टाळून पुस्तके खरेदी करावीत. घराचा स्वर्ग करायचे असेल, तर त्याठिकाणी पुस्तक असले पाहिजे. ती वाचली पाहिजेत असेही ते म्हणाले़
सहाय्यक ग्रंथालय संचालक हुसे यांनी ‘नांदेड ग्रंथोत्सव’ हा नेहमीच राज्यात पहिल्या क्रमांकावर राहिला आहे. जिल्ह्यातील ग्रंथालयांनी येथील दालनातून उपयुक्त ग्रंथांची खरेदी करुन आपले ग्रंथालये विविध ग्रंथांनी परिपूर्ण ठेवावीत, असे आवाहन केले.
जिल्हा ग्रंथालय अधिकारी आशिष ढोक यांनी प्रास्ताविकात ‘नांदेड ग्रंथोत्सव’ आयोजनामागची भूमिका मांडली. वाचनसंस्कृती वाढावी, त्यांना नवीन ग्रंथ मिळावे यासाठी हा कार्यक्रम घेण्यात येत आहे. ग्रामीण भागात ग्रंथचळवळीचे चांगले काम होत आहे. शासनाने पुस्तकाचे गाव म्हणून सातारा जिल्ह्यातील भिल्लार गावाची निवड केली आहे, तशी गावे नांदेड येथे झाली पाहिजेत, असेही ते म्हणाले़ प्रास्ताविक देवदत्त साने यांनी केले तर प्रताप सूर्यवंशी यांनी आभार मानले.
ग्रंथदिंडीने ग्रंथोत्सवाला सुरुवात
शनिवारी सकाळी ग्रंथदिंडीने ग्रंथोत्सवाची सुरुवात करण्यात आली. ही ग्रंथदिंडी महात्मा फुले पुतळा आयटीआयपासून कुसुम सभागृहमार्गे जिल्हा ग्रंथालय कार्यालयाच्या आवारात पोहोचली. ग्रंथदिंडीची सुरुवात जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या हस्ते पूजनाने झाली.
४ या ग्रंथदिंडीमध्ये मधुबन महाराज हायस्कूल (धनेगाव), शारदा भवन हायस्कूल (नांदेड), विमलेश्वर वारकरी शिक्षण संस्था (मरळक), वारकरी सांप्रदाय भजनी मंडळ (हाळदा), बंजारा महिला नृत्य (वर्ताळा तांडा ता. मुखेड), तसेच शाहीर जाधव व चमू (सुजलेगाव ता. नायगाव) इत्यादींनी सहभाग घेतला होता. या दिंडीत साहित्यिक, ग्रंथप्रेमी आणि ग्रंथचळवळीतील मान्यवर सहभागी झाले होते.

Web Title: To preserve reading culture from 'Granthotsav'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.