गेल्या वर्षी शाळा ऑनलाईन झाल्या. तरीही शाळांनी ग्रंथालय, जलतरण तलाव, सहल, स्नेहमेळवा, क्रीडासंकुल, इतर उपक्रमांचे शुल्क वसूल केले. त्यावर पालकांनी आक्षेप घेतला होता. वर्षभर शाळा सुरू झाल्याच नाही. तरीही यंदा शाळांना अतिरिक्त सुविधांचे शुल्क मागितले आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे जे शिल्लक होते, तेही आता संपले आहे. पुन्हा एकदा व्यवसाय अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे एकरकमी शुल्क भरणे शक्य नसल्याचे पालक सांगत आहेत.
दरम्यान, काही शाळांनी शुल्क कपात करून पालकांना दिलासा दिला होता. मात्र काही शाळांनी आडमुठेपणाचे धोरण स्वीकारून पालकांना त्रास दिला. २०२०- २०२१ हे शैक्षणिक वर्ष ३० एप्रिल रोजी संपल्यानंतर इंग्रजी शाळेत नवीन शैक्षणिक वर्षाला प्रारंभ होतो. मागील वर्षीप्रमाणे यंदाही शाळा सुरू होण्याची शक्यता कमीच आहे. अशातच शाळांना शुल्क वसुलीची मोहीम हाती घेतली आहे. पालकांना मोबाईलवर मॅसेज टाकून आपल्या पाल्याची शुल्क तत्काळ जमा करावी, अशा सूचना देत असल्याची माहिती पालकांनी दिली.