नांदेड : गोवर आणि रुबेला अर्थात जर्मन गोवर या विषाणूजन्य आजारापासून मुलांचा बचाव करण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या गोवर- रुबेला लसीकरण मोहिमेच्या यशस्वीतेसाठी जिल्ह्यात मंदिर आणि मशीद या धार्मिक स्थळामधूनही जनजागृती केली जात आहे. धार्मिक स्थळांचा बालकांचे आरोग्य अबाधित राखण्यासाठी वापर केला जात आहे. जिल्ह्यात या मोहिमेला पहिल्या दिवशी चांगला प्रतिसाद मिळाला.जिल्ह्यात २७ नोव्हेंबरपासून पहिल्या टप्प्यात शाळांमधून गोवर रुबेला लसीकरण मोहिमेला प्रारंभ करण्यात आला. जिल्ह्यामध्ये ३ हजार ८४९ शाळांमध्ये ६ लाख १८ हजार २८१ विद्यार्थ्यांना लस दिली जाणार आहे. महापालिका हद्दीत १ लाख ३० हजार ७४४ विद्यार्थी, न. प. क्षेत्रात ९९ हजार ७२८ आणि ग्रामीण भागात ३ लाख ८७ हजार ८१० विद्यार्थी आहेत. या सर्व विद्यार्थ्यांना पहिल्या दोन आठवड्यांत लस दिली जाणार आहे.या मोहिमेच्या यशस्वीतेसाठी जिल्ह्यात प्रचार आणि प्रसिद्धी केली जात आहे. यापूर्वी वैद्यकीय वैद्यकीय प्रतिनिधी रॅली काढण्यात आली. तसेच बालरोगतज्ज्ञ संघटना, वैद्यकीय क्षेत्रातील निमा, आयएमए तसेच लॉयन्स क्लब, रोटरी क्लब आणि इतर स्वयंसेवी संस्थाही जनजागृतीसाठी पुढे आल्या आहेत.शासकीय यंत्रणांच्या अथक परिश्रमाने भारतातील देवी, पोलिओ, धनुर्वात या आजारांचे समूळ उच्चाटन झाले आहे. आता गोवरची पाळी आहे. सुजाण पालकांनी बालकांचे लसीकरण करुन घेणे अनिवार्य आहे. कोणत्याही अफवा, नकारात्मक गोष्टींवर विश्वास न ठेवता आपली पुढील पिढी सुरक्षित करण्यासाठी हे लसीकरण आवश्यक असल्याचे सांगितले जात आहे.गोवर या विषाणूजन्य आजारामुळे अचानक अंधत्व येणे, मेंदूज्वर, निमोनिया, डायरीया होण्याची शक्यता असते. लसीकरणामुळे गोवरला ९५ टक्के रोखता येते. रुबेला म्हणजेच जर्मन गोवर हा देखील विषाणूजन्य आजार आहे. स्त्रीच्या गरोदरपणात हे विषाणू सहज आघात करु शकतात.यामध्ये गर्भाशयातच बाळ दगावणे अथवा मृत्त अर्भक जन्माला येणे, मतिमंद बाळ असणे, जन्मत:च कर्णबधीर अथवा अपंग जन्माला येणे आदी धोके या आजारामुळे संभवतात. त्यामुळे मुलींसाठी ही लस उपयुक्त आणि गरजेचे आहे. या मोहिमेत ९ ते १५ वर्षे वयोगटातील मुलांना लस दिली जाणार असून लसीकरणासाठी पालकांनी पुढाकार घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
- महत्त्वाची बाब म्हणजे गोवर, रुबेलाच्या यशस्वीतेसाठी जिल्ह्यातील धार्मिक स्थळांचाही वापर केला जात आहे. गावातील मंदिर आणि मशीद तसेच इतर धार्मिक स्थळावर असलेल्या लाऊडस्पीकरद्वारे मोहिमेबाबत जनजागृती केली जात आहे. ज्या दिवशी गावात लसीकरण करण्यात येणार आहे, त्या दिवशी दिवसभर मोहिमेबाबत माहिती दिली जाणार आहे. २६ नोव्हेंबर रोजी जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये प्रभातफेरी काढण्यात आली होती.