पुलवामा हल्ल्याचे जिल्हाभरात संतप्त पडसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2019 12:26 AM2019-02-16T00:26:46+5:302019-02-16T00:27:11+5:30
जम्मू कश्मीर येथील पुलवामा येथे केंद्रीय राखीव दलाच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात ४० जवान शहिद झाल्याची घटना १४ फेब्रुवारी रोजी घडली होती़ या घटनेबद्दल देशभर संताप व्यक्त करण्यात येत असून नांदेडातही भाजपा, शिवसेना, मनसे, राष्ट्रवादी यासह विविध संघटना, शाळा, महाविद्यालयांमध्ये शहिदांना श्रद्धांजली अर्पण करीत दहशतवाद्यांचे पुतळे जाळून निषेध करण्यात आला़ यावेळी भारत माता की जय च्या घोषणांनी परिसर दणाणून गेले होते़ जुना मोंढा आणि नवीन मोंढा भागात व्यापाऱ्यांनी बंद पाळून शहिदांना श्रद्धांजली अर्पण केली़
नांदेड : भाजपाकडून शिवाजी पुतळा भागात पाकीस्तानच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले़ यावेळी भारत माता की जय च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता़
यावेळी महानगराध्यक्ष संतुक हंबर्डे, व्यापारी आघाडीचे दिलीप कंदकुर्ते, चैतन्य बापू देशमुख, विरोधी पक्ष नेता गुरुप्रितकौर सोढी, युवा मोर्चाचे अध्यक्ष दिलीपसिंग सोढी, प्रविण साले, राजेंद्रसिंग पुजारी, अकबर खान पठाण, शितल भालके, अरुंधती पुरंदरे यांची उपस्थिती होती़
तरोडा नाका येथील शेतकरी चौकात शिवसेनेच्या वतीने पाकीस्तानचा प्रतिकात्मक पुतळा जाळत पाकीस्तानच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली़ यावेळी समन्वयक धोंडू पाटील, सहसंपर्क प्रमुख प्रकाश मारावार, शहर प्रमुख सचिन किसवे, प्रमोद खेडकर, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख महेश खेडकर, विकास देशमुख, राजू मोरे यांची उपस्थिती होती़ गुरुद्वारा चौरस्ता येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाप्रमुख माँटीसिंग जहागिरदार यांच्या नेतृत्वाखाली पाकीस्तानचा प्रतिकात्मक पुतळा दहन करण्यात आला़ यावेळी पाकीस्तानचा कायमचा बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात आली़ यावेळी शहर अध्यक्ष अब्दूल शफीक, राजू बर्डे पाटील, शक्तीसिंह परमार, सुरेखा पाटील, स़यासीर, संतोष सुन्नेवाड, जैनेंद्र केंद्रे, गजानन चव्हाण, रवि राठोड, अनिकेत परदेशी, कृष्णा वासमवार, बालाजी कल्याणे यांचा सहभाग होता़ राष्ट्रवादी युवक काँग्रेसने अजहर मसूद याच्या छायाचित्राला जोडे मारण्यात आले़ यावेळी शहराध्यक्ष रऊफ जमीनदार, डॉ़मुजाहेद खान, दासराव पूयड, जर्नेलसिंग गाडीवाले, माधव चिंचोळे पाटील, निशील नाईक हे उपस्थित होते़ दिवसभर शहरातील विविध भागात पक्ष, सामाजिक संघटना यांच्याकडून हल्ल्याचा निषेध करीत आंदोलन करण्यात येत होते़
आयटीआय चौकात काँग्रेसचे आंदोलन
पुलवामा येथील भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शुक्रवारी सायंकाळी आयटीआय चौक येथे निदर्शने करण्यात आली़ यावेळी दहशतवाद्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले़ तसेच पाकीस्तान मुर्दाबादच्या घोषणा देण्यात आल्या़ या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता़
यावेळी महानगराध्यक्ष आ़अमरनाथ राजूरकर, महापौर शीलाताई भवरे, उपमहापौर विनय गिरडे पाटील, विरेंद्रसिंघ गाडीवाले, विजय येवनकर, शमीम अब्दुल्ला, उमेश पवळे, आनंद चव्हाण, आनंद गुंडीले, साबेर चाऊस, दुष्यंत सोनाळे, किशन कल्याणकर, दीपक पाटील, फारुख बदवेल, नागनाथ गड्डम, मुन्तजीब, अमित तेहरा, दयानंद वाघमारे, सुभाष पाटील यांची उपस्थिती होती़
सायंकाळी वजिराबाद चौकात विविध संघटनांच्या वतीने श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते़ यावेळी हजारो नागरीकांनी हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली अर्पण केली़ यावेळी पोलिस अधीक्षक संजय जाधव, अप्पर पोलिस अधीक्षक डॉ़अक्षय शिंदे, उपाधीक्षक फस्के उपस्थित होते़
१७२ जणांचे रक्तदान
हल्ल्यातील जखमी जवानांना रक्त पाठविण्यासाठी अॅड़दिलीप ठाकूर यांनी आयोजित केलेल्या रक्तदान शिबीरात १७२ बाटल्या रक्त संकलित झाले आहे़ संकलित झालेले हे रक्त ताबडतोब विमानाने जम्मू-कश्मीरला पाठविण्यात आले आहे़ भाजपा, अमरनाथ यात्री संघ व लॉयन्स क्लबच्या वतीने हे शिबीर घेण्यात आले़ यावेळी उपायुक्त संतोष कंदेवाड, चंचलसिंग जट, धीरज स्वामी, राजू मोरे, पंजाबराव काळे, अविनाश बिडवई, डॉ़मनाठकर यांची उपस्थिती होती़