फोनपेवर २ लाख टाक, नाही तर मुलगा दिसणार नाही; अपहरणकर्ता निघाला कुटुंबातीलच सदस्य
By शिवराज बिचेवार | Published: September 4, 2023 07:24 PM2023-09-04T19:24:38+5:302023-09-04T19:25:15+5:30
मुलाच्या आईच्या जीवाची मात्र घालमेल होत होती. चिमुकला कुशीत येताच त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रृ तराळले.
नांदेड- फिरायला घेवून जातो म्हणून कुटुंबातील सदस्यानेच एका सात वर्षीय चिमुकल्याचे अपहरण केले. मुलाच्या आईला फोन करुन माझ्या फोन पे वर दोन लाख रुपये पाठव नाही तर मुलगा दिसणार नाही अशी धमकी दिली. ही घटना हदगांव तालुक्यातील तामसा येथे घडली. या प्रकरणात गुन्हा दाखल होताच अवघ्या सात तासात सायबर सेलच्या माध्यमातून पोलिसांनी आरोपीच्या बासर येथे मुसक्या आवळल्या अन् अपहृत मुलाची सुखरुप सुटका केली. परंतु हे सात तास मुलाच्या आईच्या जीवाची मात्र घालमेल होत होती. चिमुकला कुशीत येताच त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रृ तराळले.
गीतांजली शंकर कडबाने या तामसा येथील मध्यवर्ती बँकेसमोर राहतात. त्यांना सात वर्षाचा मुलगा आहे. २ सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता कुटुंबातीलच सुनिल दिगंबर कडबाने हा त्यांच्या मुलाला बाहेर फिरवून आणतो म्हणून सोबत घेवून गेला. त्यानंतर गीतांजली यांना फोनवर संपर्क साधून माझ्या फोन पे वर दोन लाख रुपये पाठव नाही तर मुलगा पुन्हा दिसू देणार नाही, अशी धमकी देवून फोन कट केला. त्यामुळे घाबरलेल्या गितांजली यांनी तामसा पोलिस ठाण्यात धाव घेतली. त्यावरुन गुन्हा नोंदविण्यात आला.
सपोनि मुंजाजी दळवी यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून लगेच सायबर सेलला माहिती दिली. त्यानंतर नांदेड रेल्वेस्टेशन, धर्माबाद, आणि बासर येथे आरोपीचा शोध घेतला. त्यानंतर सायबर सायबर शाखेने काढलेल्या लोकेशनवरुन आरोपी आणि पिडीत मुलगा हा बासर येथे असल्याची माहिती मिळाली. पथकाने तातडीने बासर गाठून आरोपी सुनिल कडबाने याच्या मुसक्या आवळल्या. तसेच पिडीत मुलाची वैद्यकीय तपासणी करुन त्याच्या आईच्या ताब्यात देण्यात आले.
सात तासात लावला शोध
पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अप्पर पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार, खंडेराय धरणे, सहाय्यक पाेलिस अधीक्षक शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. मुंजाजी दळवी, पोउपनि सरोदे, पोउपनि गंगाप्रसाद दळवी, पाेहेकॉ.राजेंद्र सिटीकर, दीपक ओढणे, दविद पिडगे, गुंडेवार, गोंदगे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.