रहाटीची जि.प.शाळा बनली डिजिटल ज्ञानरचनावादी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2019 01:00 AM2019-02-13T01:00:25+5:302019-02-13T01:03:57+5:30
बारूळ केंद्रातंर्गत येणारी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राहाटी. या शाळेची ओळख आता सर्वदूर झाली आहे. ही शाळा लोकसहभाग व ग्रामपंचायतीच्या १४ व्या वित्त आयोगातून डिजिटल ज्ञानरचनावादी झाली.
बारूळ : बारूळ केंद्रातंर्गत येणारी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राहाटी. या शाळेची ओळख आता सर्वदूर झाली आहे. ही शाळा लोकसहभाग व ग्रामपंचायतीच्या १४ व्या वित्त आयोगातून डिजिटल ज्ञानरचनावादी झाली.
शाळेतील शिक्षक केंद्रे यांनी ज्ञानरचनावादी डिजिटल गुणवत्तापूर्ण साहित्य तयार करून शाळेमध्ये अध्यापनात त्याचा वापर करून विद्यार्थी गुणवत्ता वाढविलेली आहे. त्याचबरोबर या शाळेतील प्रत्येक उपक्रमाची प्रसिद्धी ते फेसबुक, व्हॉटस्अप, यूट्यूबच्या माध्यमातून पाठवितात. अशी ही डिजिटल ज्ञानरचनावाद राबविणारी शाळा. शाळेमध्ये तंबाखूमुक्त शाळा, माझी शाळा सुंदर शाळा, दप्तराविना शाळा, दिवस शिष्यवृत्तीचा, विविध जयंती-पुण्यतिथी साजरी केली जातात व शासनाचा प्रत्येक उपक्रम शाळेत राबविला जातो. या शाळेला ग्रामसंवादाच्या माध्यमातून येथील शिक्षकांनी या शाळेची ओळख परिसरात निर्माण केली आहे.
या शाळेमध्ये सध्या चार शिक्षक कार्यरत असून मुख्याध्यापक एस. टी. पवळे, ए.बी. पवळे, विशाल शिंदे हे जून २०१८ पासून व केंद्रे हे गेल्या अडीच वर्षांपासून कार्यरत आहेत. या शाळेत प्रोजेक्टरद्वारे विद्यार्थ्यांना डिजिटल अभ्यासक्रमाचे धडे दिले जात अहेत. विद्यार्थी स्वत: प्रोजेक्टर हाताळतात व गुणवत्तापूर्ण ज्ञानरचनावादी साहित्याद्वारे हसत -खेळत ज्ञानदानाचे कार्य या शाळेत होते. तसेच शाळेकडून विद्यार्थ्यांच्या कलागुणांसाठी देशभक्तीपर, सांस्कृतिक, नाटिकांसह आदी कार्यक्रम शाळेकडून घेण्यात येतात. त्याचबरोबर आकर्षक रंगरंगोटी, स्वच्छ पिण्याचे पाणी, विविध सुविधायुक्त शाळा आहे. या शाळेच्या विकासासाठी या तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी सतीश व्यवहारे, बारूळ बीटचे शिक्षण विस्तार अधिकारी नंदकुमार कवठेकर, केंद्रप्रमुख येणगे हेसुद्धा प्रयत्नशील असतात.
त्याचबरोबर रहाटी गावचे सरपंच, उपसरपंच, गावचे पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष त्याचबरोबर नवीन युवक मंडळी, व सर्व गावकरी शाळा विकासासाठी सदैव तयार असतात. या शाळेत मुला-मुलींसाठी शौचाालयाची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. शाळेसाठी ग्रामपंचायत कार्यालयाकडून ८५००० हजार, लोकसहभाग ३०००० हजार, शिक्षकांनी १० हजार असे १ लाख २५ हजार शाळेसाठी खर्च करुन शाळा व परिसरांचा बदल केला आहे.