परतीच्या पावसाने पिकांची दाणादाण; शेतकरी सापडला संकटात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2019 06:46 PM2019-10-22T18:46:17+5:302019-10-22T18:50:02+5:30
नदी-नाले दुथडी भरून वाहू लागले
नांदेड : पावसाळा सुरु झाल्यानंतर तब्बल दीड महिना उशिराने जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली होती़ त्यानंतर मधल्या काळात खंड दिल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले होते़ त्यानंतर मात्र पावसाने कमी दिवसांत सरासरी भरुन काढली़ परंतु आता परतीच्या पावसाने शेतकऱ्यांची चिंता वाढविली आहे़ दिवाळीच्या मुहूर्तावर शेतकऱ्यांनी सोयाबीनची कापणी करुन ठेवली आहे़ परंतु पावसामुळे हे सोयाबीन हातचे जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे़ गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात सलग पाऊस सुरु आहे़
कंधार तालुक्यातील सोयाबीन, ज्वारी, कापूस पिकाला सततचा होणारा पावसाचा मारा असह्य होत आहे. शिवारातील कापणी केलेल्या सोयाबीन व ज्वारी पिकाला सुरक्षित ठेवायला संधी मिळत नाही. त्यामुळे ही पिके हातची निसटणार, अशी भीती शेतकऱ्यांत निर्माण झाली आहे. सतत दुसऱ्या दिवशीही पावसाच्या हजेरीमुळे सखल भागात शेतात पाणी साचले आहे. अतिपावसाने कापसाचे झाड वाळण्याचे व कापणी केलेली पिके सडण्याची भीती सतावत आहे.
१८ आॅक्टोबर रोजी रात्री हलका पाऊस झाला़ पण तो कापणी केलेल्या पिकांची नासाडी करण्यास कारणीभूत ठरला. शनिवारी कापणी केलेले सोयाबीन, ज्वारी गोळा करून संरक्षित करण्याचा प्रयत्न शेतकरी करत होते. परंतु जमिनीला पिके चिटकलेली होती. तरीही शेतकरी रविवारी उन्हात पिके वाळवता येतील या अपेक्षेने मोठा खटाटोप करत होते. मात्र यावर निसर्गाने मात केली. पहाटेच मोठ्या पावसाने हजेरी लावली आणि पिकांचे मोठे नुकसान केले.
कौठा : रविवारी पहाटेच्या सुमारास जोरदार झालेल्या पावसाने गोणार, जाकापूर, कौठा, बारुळ रस्त्यावरून पाणी वाहू लागल्याने वाहतूक पूर्णपणे बंद झाली होती़ तर मन्याड नदीलगत असलेल्या शेतकऱ्यांचे कापलेले सोयाबीन वाहून गेल्याची घटना कौठा येथे घडली़ मानार प्रकल्पातून अतिपाणी निचरा होत असल्याने मन्याड नदी तुडुंब वाहत आहे़ अनेक शेतकऱ्यांनी उघाड पडल्याने मोठ्या प्रमाणात सोयाबीनची कापणी केली़ मात्र परतीच्या पावसाचा फटका मोठ्या प्रमाणात बसला आहे़ सकाळपासून आभाळ भरून येत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे़ पुराच्या पाण्याने राजू देशमुख, गणेश देशमुख यांचे एकत्रित केलेले सोयाबीन वाहून गेले़
हिमायतनगर : तालुक्यात रविवारी सकाळी पाऊस झाल्याने कापलेले सोयाबीन भिजले़ अनेक शेतकऱ्यांचे कापणीला आलेल्या सोयाबीनच्या माना मोडत आहेत़ कपाशीची खालची बोंडे नासत आहेत़ परतीचा पाऊस खरीप पिकांना धोका देणारा ठरत आहे. २१ आॅक्टोबर रोजी मतदान असल्याने ४८ तासांत पावसाचा अंदाज वर्तविल्याने निवडणूक कर्मचाऱ्यांनाही धास्तीने त्रस्त केले आहे़ काही शेतकऱ्यांनी सोयाबीन काढले तर काहींनी कापून ढीग लावला़ ज्वारी कापणीला आली असून पावसामुळे ती काळी पडली आहे.मागील दोन वर्षांत १५ सप्टेंबरनंतर पाऊस झाला नाही़ परंतु आॅक्टोबरमध्येही परतीचा पाऊस पडत असल्याने रबीचे पीक हमखास येणार, पण खरिपाचे नुकसान होत आहे़पावसाळा सुरु झाल्यानंतर पावसाने अनेक दिवस उघडीप दिली होती़ त्यामुळे पेरण्या खोळंबल्या होत्या़ आता पिके चांगली आली असताना पावसाने पुन्हा घोळ घातला़
ज्वारी, सोयाबीन पीक हातचे जाणार
पावसामुळे पांढऱ्या ज्वारी पिकांचे मातेरे झाले आहे. शिवारात काळ्या ज्वारी पिकांची कापणी करून आडवी करण्यात आली. आता पुन्हा झालेल्या पावसाने धान वाढणार असून ज्वारी धमक होईल. भीतीने शेतकऱ्यांना ग्रासले आहे.तसेच कापणी केलेले सोयाबीन पीक काळे, डागेल व बुरशीमय होण्याची चिंता सतावत आहे. त्यामुळे ज्वारी व सोयाबीन पिकांचे मातेरे होण्याचा धोका बळावला आहे.कापसाने कीड, गुलाबी बोंडअळीचा आघात सहन केला. त्याला संरक्षित करण्यासाठी शेतकऱ्यांना खर्च करावा लागला. परंतु मागील अतिपावसाने सखल भागात पाणी साचून कापूस ईटकरी रंगाचा झाला होता. उघडीपने आशा पल्लवित झाली होती. परंतु, अचानक पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शेतकरी संकटात सापडला आहे़