महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या नांदेड विभागात जवळपास साडेसहाशे बसगाड्या आहेत. त्यापैकी साडेचारशे ते पाचशे बस नियमित रस्त्यावर असतात. प्रवाशांना सुरक्षित आणि कमी खर्चात प्रवास देण्यासाठी कटिबद्ध असलेल्या एसटी महामंडळाकडून प्रवाशांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसून येत आहे. नांदेड जिल्ह्यात धावणाऱ्या तसेच नांदेड विभागातून मुंबई, नागपूर, कोल्हापूर, लातूर, शेगाव, औरंगाबाद, बीड आदी लांब पल्ल्यासाठी धावणाऱ्या बसलादेखील सोयी-सुविधा नसल्याचे चित्र दिसत आहे. या गाड्यामध्ये ना अग्निशमन यंत्रणा ना प्रथमोपचार पेट्या, अशी अवस्था आहे. पूर्वी पाट्यांचा वापर करून प्रवाशांना बस कुठे चालली, याची माहिती मिळत होती; परंतु आजच्या स्थितीत बहुतांशी गाड्याच्या काचावर चुन्याने नावे टाकली जातात. ती अनेक वेळा मिटवली जात नाहीत, त्यामुळे बस नेमकी कोणत्या गावाला चालली, हेच प्रवाशांच्या लक्षात येत नाही.
चौकट
प्रथमोपचार पेट्याही गायब
बसला किरकोळ अपघात झाला अथवा प्रवासात एखाद्या प्रवाशाला काही इजा पोहोचली तर त्यांना वेळीच प्रथमोपचार मिळावा. या उद्देशाने सर्वच गाड्यामध्ये प्रथमोपचार पेट्या, किट ठेवलेली असते; परंतु नांदेड आगार आणि विभागातील जवळपास सर्वच बसमधील प्रथमोपचार पेट्या गायब झाल्याचे दिसून येत आहे. तर ज्या बसमध्ये पेट्या आहेत, त्यात उपचारासाठी लागणारे कोणतेही साहित्य आढळून आले नाही. त्यामुळे सर्व गाड्यामध्ये तपासणी करून मेडिकल किट ठेवण्याची गरज आहे.
आगारात आओ जाओ घर तुम्हारा
नांदेड आगारात पोलीस चौकी आहे; परंतु ती केवळ नावालाच आहे. बसस्थानकातच काय आगारात कुठेही, कोणत्याही कार्यालयाच्या केबिनमध्ये चक्कर मारा, तुम्हाला कोणीही हटकणार नाही. बसस्थानकात फेरफटका मारून बस चालविण्याचा प्रयत्न केला तरी कोणीही विचारणा केली नाही. उलट प्रवाशांनी बस कुठे चालली, अशी विचारणा करून बसमध्ये बसू देण्याची विनंती केली.
हा तर स्मोकिंग झोन
बसस्थानक परिसरातील अस्वच्छता आणि दुर्गंधीला प्रवासी की प्रशासन जबाबदार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. जवळपास सर्वच प्रवासी लघुशंकेसाठी बसस्थानकाच्या संरक्षक भिंतीचा सहारा घेतात. तर प्रवेशद्वाराच्या बाजूला असलेल्या पानटपऱ्या आणि हॉटेलमध्ये बिनधास्तपणे सिगारेट, बिडी ओढणारे टोळकेच्या टोळके बसलेले असतात. त्यांच्यावर कुणाचेही नियंत्रण नसल्याने या ठिकाणी स्मोकिंग झोन असल्याचाच भास होतो.
वायफाय सुविधा नावालाच
बसमध्ये वायफाय सुविधा उपलब्ध करून दिली त्यावेळी शासनाने मोठा गाजावाजा केला; परंतु अल्पावधीतच ही योजना फेल ठरली. बऱ्याच प्रवाशांना बसमध्ये वायफाय सेवा असते अथवा होती, हेदेखील माहिती नाही. त्यामुळे वायफायपेक्षा सुरक्षित आणि सवलतीत प्रवास द्यावा, अशी अपेक्षा प्रवासी व्यक्त करत आहेत.