नांदेड : अवैध वाळू उपसा करणारे दोन सक्शन पंप नांदेड आणि मुदखेड तहसीलच्या पथकाने शुक्रवारी जिलेटीन स्फोटाने नष्ट केले.
मुदखेड तालुक्यात वासरी येथे अवैध वाळू उपसा सुरु असल्याची माहिती मिळाल्यानंतर मुदखेड तहसीलच्या पथकाने शोध मोहीम सुरु केली. त्यामुळे वाळू माफियांनी अवैध उपसा करण्यासाठी वापरण्यात येत असलेले 2 सक्शन पंप नांदेड तालुक्यातील किकी शिवारात एका नाल्यात लपवून ठेवले. नांदेड तहसीलच्या पथकाने हे सक्शन पंप शोधून काढले. गुरुवारी महसूल व पोलीस पथकाने हे सक्शन पंप ताब्यात घेतले. मात्र वाळू माफियांनी पुन्हा सक्शन पंप मुदखेड तालुक्यात चोरून नेले. चक्क नदीपात्रात सक्शन पंप लपवून ठेवले. शुक्रवारी सकाळी नांदेडचे प्रभारी तहसीलदार मुगाजी काकडे, मुदखेडचे तहसीलदार दिनेश झांबले यांच्या पथकाने पुन्हा शोध मोहीम राबवली. वासरी शिवारात हे सक्शन पंप सापडले. हे सक्शन पंप जिलेटीन कांड्यानी उडवण्यात आले.
जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. नांदेड जिल्ह्यात आतापर्यंत 5 सक्शन पंप उडवण्यात आले आहेत.यात मुदखेड तालुक्यात 4 आणि नांदेड तालुक्यात एक सक्शन पंप नष्ट करण्यात आल्याची माहिती प्रभारी तहसीलदार काकडे यांनी दिली.