‘गोदावरी मानार’ चे होणार फेरमूल्यांकन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2018 12:30 AM2018-04-27T00:30:23+5:302018-04-27T00:30:23+5:30
जिल्हा मध्यवर्ती बँकेचे ५४ कोटींचे कर्ज असलेल्या गोदावरी मानार सहकारी साखर कारखान्याच्या कर्ज वसुलीसाठी गोदावरी मानार कारखाना विक्रीसाठी काढला आहे. कारखान्याच्या विक्री प्रक्रियेस तीन वेळा प्रतिसाद मिळाला नाही. परिणामी गोदावरी मानारचे आता फेरमूल्यांकन करण्याचा निर्णय जिल्हा बँकेने घेतला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : जिल्हा मध्यवर्ती बँकेचे ५४ कोटींचे कर्ज असलेल्या गोदावरी मानार सहकारी साखर कारखान्याच्या कर्ज वसुलीसाठी गोदावरी मानार कारखाना विक्रीसाठी काढला आहे. कारखान्याच्या विक्री प्रक्रियेस तीन वेळा प्रतिसाद मिळाला नाही. परिणामी गोदावरी मानारचे आता फेरमूल्यांकन करण्याचा निर्णय जिल्हा बँकेने घेतला आहे.
जिल्ह्यातील पाच मोठ्या कारखान्यांकडे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे कोट्यवधींचे कर्ज आहे. या कारखान्यांकडील वसुलीचे प्रयत्न जिल्हा बँकेकडून सुरु आहेत. त्यात ५४ कोटींचे कर्ज असलेल्या गोदावरी मानार कारखान्याची तीन वेळा विक्री प्रक्रिया केली. मात्र त्यास प्रतिसाद मिळाला नाही. गोदावरी मानारचे जिल्हा बँकेने यापूर्वी ५२ कोटींचे मूल्यांकन केले होते. आता चौथ्यांदा विक्री प्रक्रिया सुरु करण्यापूर्वी जिल्हा बँकेकडून गोदावरी मानारचे फेरमूल्यांकन केले जाणार आहे. गोदावरी मानारकडे जिल्हा बँकेचे मूळ ५४ कोटींचे कर्ज आहे तर बाजूला ठेवलेल्या व्याजासह ही रक्कम १०१ कोटी रुपये इतकी आहे.
दरम्यान, जिल्हा बँकेचे ४७ कोटी रुपये कर्ज असलेल्या कलंबर सहकारी साखर कारखान्याच्या विक्रीचीही प्रक्रिया पाच वेळा करण्यात आली.
पाचव्यांदा औरंगाबादच्या प्रणव आॅटोने हा कारखाना खरेदी करण्यासाठी तयारी दर्शविली. यासाठी २ कोटी रुपये सुरक्षा ठेव अनामत (इएमडी) भरली आहे.
मात्र सदर विक्री प्रक्रियेला साखर आयुक्तांनी परवानगी दिली नाही. तसेच मंत्रीगट समितीनेही कलंबरच्या विक्री प्रक्रियेला स्थगिती दिली आहे. या सर्व प्रकारात जिल्हा बँकेने आता न्यायालयात धाव घेण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठीची आवश्यक ती तयारी केली जात आहे.
अन्य तीन कारखान्यांकडेही कोटींच्या आकड्यात रक्कम थकीत आहे. मात्र या कर्ज प्रकरणासाठीचे कोणतेही गहाण खत बँकेकडे उपलब्ध नसल्याची खळबळजनक बाबही आता पुढे आली आहे.
हुतात्मा जयवंत पाटील सहकारी कारखान्याकडे ५४ कोटी, जय अंबिका सहकारी साखर कारखान्याकडे ५२ कोटी आणि जय शिवशंकर कारखान्याकडे साडेतीन कोटी रुपये थकीत आहेत. या कारखान्याकडील कर्ज वसुलीसाठी जिल्हा बँकेकडून प्रयत्न सुरु आहेत.
त्यात हु. जयवंत पाटील सहकारी साखर कारखान्याच्या कर्ज वसुलीसंदर्भात जिल्हा बँकेने तत्कालीन संचालकांकडून ही कर्ज वसुली करण्यासंदर्भात न्यायालयातून आदेश मिळविले आहेत. जय शिवशंकर कारखान्याकडून साडेसात कोटींची वसुली जिल्हा बँकेने केली आहे. उर्वरित साडेतीन कोटी रुपयांच्या वसुलीसाठीही प्रयत्न सुरु आहेत.
नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँक आली नफ्यात
जिल्हा बँकेवर रिझर्व बँकेने घातलेले निर्बंध २०१३ मध्ये उठविल्यानंतर २०१५ मध्ये संचालक मंडळ अस्तित्वात आले. मागील तीन वर्षांत जिल्हा बँक पहिल्यांदाच मोठ्या नफ्यात आली आहे. बँकेचा आजघडीचा निव्वळ नफा पाच कोटीवर आला आहे. मार्च २०१८ अखेर जिल्हा बँकेने ८ कोटी ५३ लाखांचा नफा मिळविला होता. आयकर वगळता निव्वळ नफा पाच कोटींचा आहे. यामध्ये महत्वाचे म्हणजे नांदेड जिल्हा बँकेने नांदेड सहकारी सूत गिरणीकडील ९ कोटी ६८ लाखांची मोठी वसुली केली. नांदेड सहकारी सूत गिरणीवर मूळ कर्ज ३ कोटी ८४ लाखांचे होते. व्याजासह जिल्हा बँकेने वसुली केली. परिणामी बँकेचा नफा वाढत गेला. जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिनकर दहिफळे, संचालक मंडळांच्या उपाययोजना उपयुक्त ठरल्याचे कार्यकारी अधिकारी अजय कदम यांनी सांगितले.
कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीचा प्रश्न पुढच्या सभेत
जिल्हा बँकेची मासिक सभा गुरुवारी अध्यक्ष दिनकर दहिफळे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या बैठकीत एकूण २३ विषय चर्चेला होते. त्यामध्ये कर्मचाºयांच्या वेतनवाढीचा विषय होता. कर्मचाºयांच्या वेतनवाढीसंदर्भात पुढील सभेत निर्णय घेण्यात येईल, असे सांगण्यात आले. आ. प्रताप पाटील चिखलीकरांसह इतर संचालकांनी कर्मचाºयांना वेतनवाढ देणे आवश्यक असल्याचे सांगितले. बैठकीस १२ संचालक उपस्थित होते.