युवक महोत्सवात ताल-सुरांची गट्टी जमली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2018 12:40 AM2018-09-25T00:40:26+5:302018-09-25T00:41:29+5:30

‘मन उधाण वाऱ्याचे... गूज पावसाचे...’ या गीताला सुरुवात झाली आणि काही क्षणातच महोत्सवाचे रुपडे पालटले. तरुणाई ताला-सुराच्या ठेक्यावर बेधुंद होवून थिरकली.

A rhythm and tune of the youth festival was gathered | युवक महोत्सवात ताल-सुरांची गट्टी जमली

युवक महोत्सवात ताल-सुरांची गट्टी जमली

Next
ठळक मुद्देमंगेश बोरगावकर यांनी तरुणाईत फुंकला उत्साह

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : युवक महोत्सवाच्या उद्घाटनाला शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे उपस्थित राहणार होते. मात्र ऐनवेळी त्यांचा दौरा रद्द झाला. त्यामुळे उद्घाटन सोहळा पार पाडण्याची जबाबदारी स्थानिकावर आली. त्यातच उद्घाटन कार्यक्रमावेळी मुख्य रंगमंचातील काही खुर्च्या रिकाम्या होत्या. अशा वातावरणात महोत्सवाचा प्रारंभ झाल्यानंतर तरुणाईत उत्साह भरण्याचे काम प्रसिद्ध पार्श्वगायक मंगेश बोरगावकर यांनी केले. ‘मन उधाण वाऱ्याचे... गूज पावसाचे...’ या गीताला सुरुवात झाली आणि काही क्षणातच महोत्सवाचे रुपडे पालटले. तरुणाई ताला-सुराच्या ठेक्यावर बेधुंद होवून थिरकली.
या गीतानंतर बोरगावकर यांनी ‘मल्हारवारीचा सूर धरला आणि टाळ्यांचा कडकडाट प्रेक्षागृहात गुंजला. उपस्थित प्रेक्षकही बोरगावकर यांच्या गीतांना मनमुराद दाद देत होते. सैराट चित्रपटातील गाण्यांचा करिश्मा अजूनही कायम असल्याची प्रचिती आज पुन्हा या महोत्सवात दिसून आली. ‘झिंग झिंगाट’ या प्रसिद्ध गाण्यासह इतर गाण्यांनाही प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले.
महोत्सवाच्या पहिल्या दिवशी उद्घाटन सोहळ्यानंतर अटलबिहारी वाजपेयी मंचावर पोवाड्याच्या स्पर्धा पार पडल्या तर विजय चव्हाण नाट्यमंचावर मूक अभिनयातून विद्यार्थ्यांनी विविध सामाजिक प्रश्नावर भाष्य केले. या स्पर्धेत ३३ महाविद्यालयांच्या संघांनी सहभाग नोंदविला होता. किशोरी आमोनकर कलामंचावर भारतीय सुगम गायन स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत ४३ महाविद्यालयाचे कलाकार सहभागी झाले होते तर दुसरीकडे विंदा करंदीकर मंचावरही विद्यार्थ्यांची जुगलबंदी सुरू होती.
आनंदी जीवनाची अनोखी रित : साहित्य गीत संगीत या विषयावर दयानंद विज्ञान महाविद्यालयाच्या विधी पळसपुरे यांनी भाष्य केले. तर राजर्षी शाहू महाविद्यालयाच्या कृष्णा काटवटे या विद्यार्थ्याने ‘जनआंदोलने दशा आणि दिशा’ हा विषय प्रभावीपणे मांडला.
देशातील सध्याची परिस्थिती त्याने विशद केली. याबरोबरच जुन्या व नवीन गीतांचा छंद आणि संगीत या विषयावरही मांडणी झाली. वासुदेव गायतोंडे मंचावर कलात्मक जुळवणी आणि व्यंग चित्रकला हा कलाप्रकार उपस्थितांना भावला. दुपारनंतर महोत्सवामध्ये उत्साह अधिकच वाढत गेल्याचे दिसून आले.


युवक महोत्सवासाठी उदासीनता का ?

  • विद्यापीठाचा युवक महोत्सव म्हटले की, टाळ्या-शिट्ट्या आणि बेधुंद नृत्य हवेच. मात्र महोत्सवातील अनेक खुर्च्या रिकाम्या आहेत. ही उदासीनता का? महोत्सवासाठी महाविद्यालयामध्ये स्पर्धा का नाही? असा सवाल आ. प्रताप पाटील चिखलीकर यांनी उद्घाटन कार्यक्रमावेळी कुलगुरूंना विचारला.
  • सहयोग सेवाभावी संस्था वर्षानुवर्षे महोत्सव घेवू शकते. ती या संस्थेची क्षमता आहे. मात्र इतर महाविद्यालयांतही महोत्सवासाठी स्पर्धा लागली पाहिजे. युवक महोत्सव माझ्या महाविद्यालयात झाला पाहिजे, असे प्रत्येकाला वाटले पाहिजे. मात्र तसे होताना दिसत नाही. विद्यापीठांतर्गत १४० महाविद्यालये असताना सलग पाच-सहा वर्षे एकाच शहरात महोत्सव होण्याऐवजी इतरांनीही उदासीनता बाजूला सारुन महोत्सवासाठी पुढाकार घ्यायला हवे, असे त्यांनी सांगितले.
  • महोत्सव म्हटले की, वातावरण कसे जोषपूर्ण प्रफुल्लित हवे. मात्र इथे युवक महोत्सवासारखे वागत नाहीत, दिसत नाहीत, अशी टोलेबाजी करीत वर्षभर अभ्यास करताना महोत्सवाचे चार दिवस आनंदोत्सव साजरा करा, असे सांगत मी १४ पैकी १३ निवडणुका जिंकलो. म्हणून तुम्हाला राजकारणात या म्हणणार नाही. तुमच्यामुळे स्पर्धा वाढेल, तुम्ही अभ्यासच करा, असा सल्लाही त्यांनी दिला.

Web Title: A rhythm and tune of the youth festival was gathered

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.