लोकमत न्यूज नेटवर्ककंधार : शहरातील मदिनानगर येथील मदिना तूल उलूम शाळेजवळ महापालिकेच्या भूखंडावर ८ कोटी १६ लाख रुपये खर्चून उर्दू उभारण्यात आले. या उर्दू घराचे उद्घाटन या ना त्या कारणामुळे अद्याप झाले नाही. परिणामी उर्दू घराची देखभाल करण्यात दिरंगाई झाली. याच कालावधीत उर्दू घरास आग लागण्याचा प्रकार घडला होता. त्यानंतर महापालिका व जिल्हा प्रशासनाने एकत्र येऊन या उर्दू घराच्या देखभालाची व्यवस्था केली. मात्र तोपर्यंत झालेल्या नुकसानीसाठी तसेच उर्दू घराच्या किरकोळ कामासाठी जिल्हाधिकारी, कार्यकारी अभियंता यांनी शासनाकडे निधी मागितला होता.या मागणीनंतर शासनाच्या अल्पसंख्याक विभागाच्या वतीने उर्दू घराच्या दुरूस्ती आणि अतिरिक्त कामासाठी ३८ लाख ४७ हजार ७०६ रुपये मंजूर केले आहेत. या निधीतून बांधकामासाठी ३ लाख ६८ हजार, फर्निचरसाठी ५ लाख ९० हजार आणि विद्युतीकरणासाठी ५ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. यासह अतिरिक्त बांधकामामध्ये इमारतीच्या मागील बाजूस फेवर ब्लॉक बसविणे, संरक्षण भिंतीवर फेन्सींग करणे आदी कामासाठी १८ लाख ४२ हजार रुपये मंजूर करण्यात आले आहेत. किरकोळ खर्चासाठी ५८ हजार रुपये देण्यात आले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी या उर्दू घराच्या दुरुस्तीचे काम मंजूर रकमेतच पूर्ण होईल, याची खबरदारी घेण्याचे आदेशही दिले आहेत.उर्दू घराच्या उद्घाटनाची प्रतीक्षाशहरात जवळपास ८ कोटी रुपये खर्चून उर्दू घराचे काम पूर्ण झाले. आघाडी सरकारच्या कार्यकाळात झालेल्या या उर्दू घराचे उद्घाटन सत्तातरांंतर रखडले. महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्यापूर्वी हे उद्घाटन होईल अशी अपेक्षा होती. मात्र उद्घाटन झाले नाही. त्यातच उर्दू घरात अनेक गैरप्रकार झाल्याची बाबही मध्यंतरी उघडकीस आली होती. त्यामुळे या उर्दू घराच्या सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला होता. उद्घाटनाअभावी असे प्रकार घडत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. उर्दू घराचे उद्घाटन करुन सदर उर्दू घर सामान्यांसाठी खुले करुन द्यावे,अशी मागणी पुढे आली आहे.