नांदेड : दमरेच्या नांदेड विभागीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या सहा रेल्वेस्थानकांवर शुक्रवारपासून आरक्षण तिकीट देण्यास सुरुवात केली आहे़ १ जूनपासून नांदेड येथून सचखंड विशेष एक्स्प्रेस धावणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने कळविले आहे़
रेल्वे बोर्डाच्या सूचनेनूसार २२ मेपासून नांदेड विभागातील नांदेड, पूर्णा, परभणी, सेलू, जालना आणि औरंगाबाद या सहा रेल्वे स्थानकावर रेल्वे आरक्षण केंद्र पुन्हा प्रवाशांकरिता सुरु करण्यात आले आहे. तसेच लॉकडाऊन आणि कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे आरक्षण कार्यालयाच्या वेळा बदलण्यात आल्या आहेत़ आरक्षण तिकिट सकाळी ८ ते १२ या वेळेत आणि दुपारी २ वाजेपासून सायंकाळी ५ वाजेपर्यंत मिळणार आहे़
रेल्वे बोर्डाने १ जूनपासून देशामध्ये २०० रेल्वे चालविण्याचा निर्णय घेतला आहे़ यामध्ये विशेष गाड्यांचाच समावेश आहे़ त्यात नांदेड विभागातून नांदेड-अमृतसर-नांदेड दरम्यान सचखंड विशेष एक्स्प्रेस धावणार आहे. ही गाडी १ जून रोजी नांदेड येथून गाडी संख्या ०२७१५ नांदेड- अमृतसर विशेष एक्स्प्रेस बनून धावेल. तसेच ३ जून पासून अमृतसर येथून ही गाडी संख्या ०२७१६ अमृतसर-नांदेड सचखंड विशेष एक्स्प्रेस बनून धावेल. या गाडीस २२ डब्बे असतील, यात वातानुकुलीत तसेच बिगर वातानुकुलीत डब्बे असतील. सामान्य म्हणजेच जनरलचे डब्बे नसतील. या विशेष गाडीच्या वेळा नियमित नांदेड-अमृतसर-नांदेड सचखंड एस्क्प्रेस सारख्याच असतील. महाराष्ट्र सरकारने ठरवून दिलेल्या कोविड-१९ चे दिशा, निर्देशानूसार दोन जिल्ह्याअंतर्गत येणाऱ्या रेल्वे स्थानकादरम्यान प्रवाशांना या विशेष गाडीत प्रवास करता येणार नाही.
लक्षणे नसतील तरच प्रवासविशेष गाड्यांमध्ये प्रवेश करण्यापूर्वी प्रवाशांची शारीरिक तपासणी करण्यात येणार नाही. ज्या प्रवाशांना कोरोना ( कोविड-१९) ची कोणतीही लक्षणे नसतील त्यांनाच या रेल्वेत प्रवेश दिला जाणार आहे.
प्रवाशांना आवाहन रेल्वे आरक्षण केंद्र व रेल्वेस्थानकावर येताना, तसेच प्रवास करताना भारत सरकारने तसेच संबंधित राज्य सरकारने कोरोना (कोविड-१९) चा प्रसार रोखण्यासाठी दिलेल्या सूचनांचे प्रवाशांनी तंतोतंत पालन करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे़