नांदेड-वाघाळा महानगरपालिकेत ८१ पैकी ७३ नगरसेवक असल्याने काँग्रेस पक्षाची एकहाती सत्ता आहे. राज्यात व जिल्ह्यातही काँग्रेसचे ‘सरकार’ असल्याने महापालिकेने नांदेड शहराचा चेहरामाेहरा बदलवणे अपेक्षित आहे. परंतु, प्रत्यक्षात हा बदल हाेताना दिसत नाही. महापालिकेतील राजकारण व प्रशासन जणू रबरी शिक्का बनल्याचा नांदेडकरांचा सूर आहे. त्यातच त्यांना अस्तित्व हरवून बसलेल्या विराेधकांचीही अप्रत्यक्ष साथ लाभते आहे. महापालिकेत भाजपचे ६, शिवसेना १ व अपक्ष १ असे इतर संख्याबळ आहे. मात्र, विराेधी पक्षांनी जनहिताच्या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतल्याचे ऐकिवात नाही. केवळ राजकारणासाठी तेवढा विराेध अधूनमधून पाहायला मिळताे.
नांदेड शहरातील अनेक समस्या आजही आ वासून उभ्या आहेत. भूमिगत गटार याेजना आहे, परंतु त्यातील घाण पाण्याचा याेग्य निचरा केला जात नाही. तासभर मुसळधार पाऊस आला, तरी नांदेड शहरातील रस्ते पाण्याखाली येतात. शहर जणू तुंबते, असे चित्र पाहायला मिळते. मलनि:सारण याेग्य पद्धतीने हाेत नसल्याने गाेदावरीत अस्वच्छता पाहायला मिळते. त्यासाठी बसवलेले पाणी शुद्धीकरण पंपही व्यर्थ ठरत आहेत. आजही गाेदावरीमधील पाण्याचे नमुने तपासल्यास ते दूषित असल्याचे सिद्ध हाेईल. यापूर्वी याच दुषित पाण्यामुळे हजाराे मासे मृत्युमुखी पडल्याची उदाहरणे आहेत. सांडपाण्याचा निचरा हाेत नसल्याने शहरातील पिण्याच्या पाण्याचे अनेक स्रोत दूषित झाले आहेत.
चाैकट....
पार्किंग पॅटर्नने रस्ते झाले अरुंद
विदेशातील धर्तीवर शहरात पार्किंगची व्यवस्था करण्यात आली हाेती. मात्र, त्याचा फारसा उपयाेग हाेताना दिसत नाही. या पार्किंग पॅटर्नमुळे रस्ते लहान झाल्याने वाहतूककाेंडीची नवी समस्या निर्माण झाली आहे. तुप्पा येथे डम्पिंग यार्ड असले, तरी कचऱ्याची समस्या सुटलेली नाही. नागरिक कचरा टाकण्यासाठी चक्क रस्ता दुभाजकाचा वापर करीत असल्याचे चित्र तराेडानाका, छत्रपती चाैक परिसरात आहे.
चाैकट .....
पदपथ अतिक्रमणाने व्यापलेलेच
शहरातील अतिक्रमणाची अवस्थाही बिकट झाली आहे. पदपथ (फुटपाथ) नागरिकांसाठी माेकळे असणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात तेथे टपऱ्या, पानठेले, हातगाड्या व लागूनच असलेल्या दुकानांमधील साहित्याचे अतिक्रमण पाहायला मिळते. मनपाच्या पथकाने कारवाई करून पाठ फिरवताच हे अतिक्रमण पुन्हा बसते, हे विशेष.
चाैकट....
बॅनर्सने शहराचे विद्रूपीकरण
महापालिकेने नांदेड शहरात ‘नाे बॅनर्स झाेन’ तयार केले हाेते. मात्र, त्यांची काटेकाेर अंमलबजावणी न झाल्याने शहराचे विद्रूपीकरण आजही कायम असल्याचे चित्र आहे. शहराची ही झालेली वाताहत महानगरपालिकेतील ‘नामधारी’ राजकारण व प्रशासनाचे अपयश मानले जाते.