किनवट (जि़नांदेड) : रात्रीच्या वेळी गस्तीवर असणाऱ्या पोलिसांनीवाळू चोरीस प्रतिबंध करण्याचा प्रयत्न केला असता १५ ते १६ रेतीतस्करांनी पोलिसांवर प्राणघातक हल्ला केला़ ही घटना किनवट पोलीस ठाणेहद्दीत येणाऱ्या दाभाडी येथे १९ जून रोजी रात्री पावणेअकरा वाजता घडली़ यात दोन पोलिसांना गंभीर दुखापत झाली आहे़ तर इतरांना हातावर तसेच डोक्यावर मार लागला आहे़ याप्रकरणी १६ जणांविरूद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यातील सात हल्लेखोरांना अटक केली आहे़
किनवट पोलीस ठाण्याचे पोलीस नायक गजानन चौधरी, पोहेकॉ अप्पाराव राठोड व पोकॉ कुलबुद्धे हे १९ जून रोजी रात्री पेट्रोलिंग करीत होते़ गोकुंदा, कोठारी, शनिवारपेठ, दाभाडी भागात अवैध हातभट्टीची दारू गाळणाऱ्या लोकांचा शोध घेत असताना दाभाडी गावात तुकाराम दबडे यांच्या घराजवळ मोकळ्या मैदानात दोन ट्रॅक्टर ट्राली रात्री १०.४५ वाजता उभे असलेले दिसले़ त्याठिकाणी दहा ते बारा लोक होते़ गस्तीपथकाला तेथे वाळूचा साठाही दिसून आला़ तेथे जमलेले लोक दोन्ही ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये टोपले व लोखंडी खोऱ्याने वाळू भरत होते़ पोलीस पथकाने वाळूचोरीस प्रतिबंध केला असता, जमलेल्या लोकांपैकी मनोहर दबडे याने तुम्ही कशासाठी आला, अशी विचारणा करण्यास सुरुवात केली़ त्याचवेळी पोक़ॉक़ुलबुद्धे हे आपल्या मोबाईलमध्ये घटनेचा पुरावा म्हणून शूटिंग करू लागले असताना मनोहर दबडे, रामराव दबडे, अमरनाथ दबडे, अविनाश दबडे, ज्ञानेश्वर शिंदे, ज्ञानदेव खांडेकर, विठ्ठल आमणर, दीपक चिकालकर, रुपेश चिकालकर, साईनाथ गजभारे, महादेव पांढरे, बाबूराव वाळूकर, अजय दबडे (सर्व रा़दाभाडी) यांनी हातातील लोखंडी फावडे, लाकडी दांड्याने मारहाण करण्यास सुरुवात केली़ यावेळी पोलीस पथकावर दगडफेकही करण्यात आली़ यात पोहेकॉ अप्पाराव राठोड यांच्या डोक्याला व तोंडाला दुखापत झाली आहे़
तस्करांनी अचानक केलेल्या या हल्ल्यामुळे पोलिसांनी अंधारात परिसरातील घरांचा आसरा घेतला़ तसेच याबाबतची माहिती पोलीस निरीक्षक मारोती थोरात यांना देऊन पोलीस मदत मागितली़ त्यावेळी जमावातील लोक आरडाओरडा करत पोलिसांना शोधत होते़ दरम्यान, विनानंबरचे ट्रॅक्टर ट्रालीसह पसार झाले़ नंतर मदतीसाठी आलेल्या पोलीस पथकावरही जमावाने हल्ला केला़ या जमावामध्ये काही महिलाही होत्या, असे जखमी पोलिसांनी सांगितले़ याप्रकरणी पोलिसांनी किनवट पोलीस ठाण्यात १६ जणांविरूद्ध गुन्हे दाखल करून सात जणांना अटक केली आहे़
मागील महिन्यात झाला होता तलाठ्यावर हल्लाकिनवट तालुक्यातील अनेक भागात रेती चोरट्यांनी पुन्हा डोके वर काढले आहे़ २२ मे रोजी रेती तस्करांनी किनवटचे तलाठी रेड्डी यांच्यावरही असाच हल्ला केला होता़ महिनाभराच्या आत पुन्हा पोलीस कर्मचाऱ्यांवर रेतीतस्करांनी हल्ला चढविल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे़ घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक विजय पवार यांनी किनवट पोलीस ठाण्यात शनिवारी दुपारी भेट देऊन या प्रकरणाची माहिती घेतली़