नांदेड : थोर समाजसुधारक महात्मा फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना बडोदा संस्थानचे राजे सयाजीराव गायकवाड यांची वेळोवेळी आर्थिक आणि इतर मदत केल्यामुळे ते यशाचे शिखर गाठू शकले. त्यामुळे त्यांच्या यशामध्ये सयाजीराव गायकवाड यांचा मोलाचा वाटा आहे, असे मत बडोदा येथील महाराजा सयाजीराव गायकवाड विद्यापीठातील नामवंत अभ्यासक डॉ. संजयकुमार करंदीकर यांनी व्यक्त केले.स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन व अभ्यास केंद्राच्या वतीने आयोजित अध्यासन केंद्राच्या सभागृहात विशेष व्याख्यानात १७ जुलै रोजी डॉ. करंदीकर बोलत होते. यावेळी मंचावर कुलगुरू डॉ. उद्धव भोसले, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. रवि सरोदे, मराठीचे विभागप्रमुख डॉ. केशव देशमुख, अध्यासन केंद्राचे समन्वयक डॉ.पी.विठ्ठल यांची प्रमुख उपस्थिती होती.ते म्हणाले, सयाजीराव गायकवाड हे द्रष्टे राज्यकर्ते होते. वयाच्या १२ व्या वर्षांपर्यंत गुरांमागे धावणारा मुलगा पुढे एवढा मोठा राज्यकर्ता झाला. यामध्ये इंदोर येथील टी. माधवराव आणि इंग्रज अधिकारी इटोरीया यांनी त्यांना शिक्षणाचे धडे देऊन परिपूर्ण राज्यकर्ते बनविले. १९०५ मध्ये मदनमोहन मालवीय हे हिंदू विद्यापीठाचे पहिले कुलगुरू झाले होते. विद्यापीठाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी त्यांनी सयाजीरावांकडे दोन लक्ष रुपयांची मदत मागितली. सयाजीरावांनी दोन लक्ष रुपयांच्या ऐवजी पाच लक्ष रुपये देऊन शिक्षण किती महत्त्वाचे आहे आणि विद्यापीठाद्वारे ते सर्वांना मिळाले पाहिजे, याची जाणीव त्यांना होती. कुणीही गरीब, होतकरू शिक्षण घेण्यासाठी त्यांच्याकडे मदत मागितली तर तो कधीच रिकाम्या हातांनी परतला नाही. एकदा एक मातवेकर नावाच्या विद्यार्थ्यार्ला उच्च शिक्षणासाठी पॅरिसला जावयाचे होते. त्याला जाण्या-येण्याच्या खर्चासह रहाणे-खाणे यासाठी शिष्यवृत्ती दिली.मग एकदा महाराज स्वत: पॅरिसला गेले असता मातेकरांना बोलावून त्यांच्या शिक्षणाची विचारपूस केली. म्हणजेच, दिलेल्या शिष्यवृत्तीचा वापर योग्यरित्या होतो का नाही, याकडेही ते काळजीपूर्वक पाहत असत. शेवटी ते म्हणाले, महाराष्ट्रामध्ये फुले, आंबेडकर, शाहू यांचा गौरव होतो; पण त्याचबरोबर सयाजीराव गायकवाड यांचाही उल्लेख महत्त्वाचा ठरतो. सूत्रसंचालन अध्यासन केंद्राचे समन्वयक डॉ.पी.विठ्ठल यांनी केले तर सुनील ढाले यांनी आभार मानले.बाबासाहेबांना नियमात बदल करुन अखंडपणे मदतडॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्यात विशेष अनुबंध होते. बाबासाहेब पहिल्यांदा ज्यावेळी शिक्षणासाठी आर्थिक मदत मागण्यासाठी गेले असता त्यांना तात्काळ शिष्यवृत्ती मान्य करण्यात आली होती. संस्थानच्या नियमावलीमध्ये एका विद्यार्थ्याला एकदाच आर्थिक मदत करणे, असा नियम होता. पण बाबासाहेबांसाठी त्यांनी नियमात बदल करून पुढे अखंडपणे त्यांना मदत करीत राहिले. ज्यामध्ये बाबासाहेबांनी पीएच.डी. पूर्ण करून उच्चशिक्षणासाठी अनेकवेळा बाहेर देशात जाणे-येणे केले.
फुले, आंबेडकर यांच्या यशामध्ये सयाजीरावांचा मोलाचा वाटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2019 12:55 AM
थोर समाजसुधारक महात्मा फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना बडोदा संस्थानचे राजे सयाजीराव गायकवाड यांची वेळोवेळी आर्थिक आणि इतर मदत केल्यामुळे ते यशाचे शिखर गाठू शकले.
ठळक मुद्देमहाराजा सयाजीराव गायकवाड विद्यापीठाचे करंदीकर यांचे मार्गदर्शन