नांदेड विमानतळाची सुरक्षा धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2018 12:36 AM2018-04-12T00:36:27+5:302018-04-12T00:36:27+5:30

नांदेड विमानतळाच्या बफर झोन अर्थात सुरक्षा परिसरातच मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामांची संख्या वाढल्याने विमानतळाची सुरक्षा धोक्यात आली आहे. विमानतळ प्राधिकरणाने याबाबत पत्र दिल्याने खडबडून जागे झालेल्या महापालिकेने कारवाईसाठी पाच अधिकाऱ्यांची समितीही नियुक्त केली आहे.

Security threat of Nanded airport | नांदेड विमानतळाची सुरक्षा धोक्यात

नांदेड विमानतळाची सुरक्षा धोक्यात

googlenewsNext
ठळक मुद्देअनधिकृत बांधकाम : बफर झोन अर्थात सुरक्षा परिसरातच अवैध बांधकामाची संख्या वाढली

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : नांदेड विमानतळाच्या बफर झोन अर्थात सुरक्षा परिसरातच मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामांची संख्या वाढल्याने विमानतळाची सुरक्षा धोक्यात आली आहे. विमानतळ प्राधिकरणाने याबाबत पत्र दिल्याने खडबडून जागे झालेल्या महापालिकेने कारवाईसाठी पाच अधिकाऱ्यांची समितीही नियुक्त केली आहे.
ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचे शहर असलेल्या नांदेडमध्ये देश-विदेशातून येथील श्री सचखंड गुरुद्वारा दर्शनासाठी भाविक येतात. त्यासह साडेतीन पिठापैकी एक पीठ असलेल्या श्रीक्षेत्र माहूर येथेही भाविकांची मोठी संख्या आहे. विमानतळ झाल्याने येणाºया प्रवाशांची संख्या वाढत आहे. त्यातच आता नांदेड-मुंबई, नांदेड-हैदराबाद आणि नांदेड-अमृतसर विमानसेवा सुरू झाली आहे.
राजकीयदृष्ट्याही नांदेडचे महत्त्व कायमच आहे. या परिस्थितीत नांदेड विमानतळाची सुरक्षा महत्त्वाची बाब आहे. मात्र ही बाब दुर्लक्षित झाल्याने महापालिका हद्दीत विमानतळ बफर झोनमध्येच अनधिकृत बांधकामाची संख्या वाढतच चालली आहे. इतकेच नव्हे, तर मुख्य रस्त्यावरच नांदेड महापालिकेने फ्रुट मार्केटला तात्पुरता परवाना दिला. इतकेच नव्हे, तर या व्यापाºयांना व्यवसाय परवाना बहाल केला. परिणामी हे व्यावसायिक या ठिकाणी ठाण मांडून बसले आहेत. इतकेच नव्हे, तर फ्रुट मार्केटसह आता भाजीपाला मार्केटही याच भागात उभारले जात आहे. परिणामी विमानतळ सुरक्षा परिसरात या बाजारपेठांमुळे पक्ष्यांची संख्या वाढणार आहे. त्यातून विमानांना धोकाही होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दुसरीकडे विमानतळ परिसरात अवैध बांधकामही मोठ्या प्रमाणात झाले आहे. निश्चित उंचीपेक्षा अधिक उंचीची घरेही झाली आहेत. अशा घरांची वाढती संख्या लक्षात आल्यानंतर विमानतळ प्राधिकरणानेच महापालिकेला एक पत्र लिहून सदर प्रकार थांबविण्यास सांगितले. त्यानंतर खडबडून जागे झालेल्या महापालिकेने उपायुक्त, क्षेत्रीय अधिकारी, अतिक्रमण विभागाचे सहायक आयुक्त, मनपा पथकाचे पोलीस निरीक्षक आणि विमानतळ व्यवस्थापकांचा समावेश असलेली एक समिती स्थापन केली. या समितीने विमानतळाच्या सर्व बाजूने प्रत्यक्ष जागेवर निरीक्षण करुन अनधिकृत बांधकामे केलेल्या मालमत्ताधारकांना नोटीस बजावण्याची कारवाई करण्यात येणार आहे. त्यानंतर पुढील सात दिवसांत ही बांधकामे पाडून टाकण्याचे आदेशही आयुक्तांनी दिले आहेत.
त्याअनुषंगाने सदर स्थापन करण्यात आलेल्या समितीने ९ एप्रिल रोजी पाहणी केली. त्यावेळी या भागात अवैध बांधकामे झाल्याची बाब स्पष्ट झाली आहे. या बांधकामावर आता कारवाई कधी होईल याकडे लक्ष लागले आहे.विशेष म्हणजे, विमानतळ सुरक्षा परिसरात असलेल्या खाजगी भूखंडावर कोणतेही लेआऊट नसताना बांधकाम विकास केला जात आहे. पीरबुºहाणनगर भागातही बांधकामे होत असल्याची बाब या समितीच्या निदर्शनास आली आहे. त्यामुळे विमानतळाच्या पश्चिम भागातही कारवाई अपेक्षित आहे. त्याचवेळी महापालिकेने विमानतळ सुरक्षा परिसरात व्यवसाय परवाने दिले कसे? असा प्रश्नही पुढे आला आहे. हे क्षेत्र प्रतिबंधित असतानाही परवाने देणाºयांची चौकशी मनपा करेल का? असा प्रश्नही पुढे आला आहे.

विमानतळाची सुरक्षा महत्त्वाचीच
नांदेड विमानतळाच्या सुरक्षेच्या अनुषंगाने महापालिका निश्चितच कारवाई करत असल्याचे आयुक्त गणेश देशमुख यांनी सांगितले. विमानतळ सुरक्षेच्या अनुषंगाने अनधिकृत बांधकाम हटविण्यासाठी महापालिकेने विशेष समिती गठीत केली आहे. या समितीमार्फत पाहणी केली असून निश्चितच येत्या काही दिवसांतच कारवाई केली जाईल, असे आयुक्त गणेश देशमुख यांनी स्पष्ट केले.
ऐतिहासिक तसेच राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे स्थान असलेल्या नांदेड विमानतळाच्या सुरक्षेचा विषय गांभीर्याने घ्यावाच लागणार आहे. याबाबत महापालिकेला निर्देश देण्यात आले आहेत. महापालिकेकडून कारवाई केली जाईल, अशी अपेक्षा आहे. आगामी कालावधीत विमानतळ सुरक्षा परिसरात कोणतेही अतिक्रमण होऊ नये, याची खबरदारी घेणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी सांगितले.

Web Title: Security threat of Nanded airport

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.