जिल्ह्यात निवडक अंगणवाड्या, शाळा होणार पंचतारांकित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:19 AM2021-02-16T04:19:31+5:302021-02-16T04:19:31+5:30
प्रायोगिक तत्त्वावर जिल्ह्यातील शाळा भौतिकदृष्ट्या समृद्ध, सर्वांग सुंदर आणि गुणवत्तापूर्ण करण्यासाठी सामूहिक प्रयत्नांचा प्रकल्प म्हणजे नांदेड जिल्हा फाइव्ह स्टार ...
प्रायोगिक तत्त्वावर जिल्ह्यातील शाळा भौतिकदृष्ट्या समृद्ध, सर्वांग सुंदर आणि गुणवत्तापूर्ण करण्यासाठी सामूहिक प्रयत्नांचा प्रकल्प म्हणजे नांदेड जिल्हा फाइव्ह स्टार स्कूल आहे. यात पाच मूळ मुद्द्यांवर काम करण्यात येणार आहे. शाळांच्या भौतिक सुविधा, तंत्रज्ञानाचा वापर आणि नावीन्यपूर्ण शैक्षणिक पद्धती, लोकसहभाग आणि अभिसरण, शिक्षक समृद्धी, सकारात्मक बदल या मुद्यांवर जिल्ह्यातील निवडक शाळांमध्ये काम करण्यात येणार आहे. तर, निवडक अंगणवाड्यांमधून लाभार्थ्यांना प्रभावीपणे तसेच जलदगतीने दर्जेदार व गुणवत्तापूर्ण सुविधा पुरविणे, अंगणवाडी केंद्राचे सुशोभीकरण करणे, पायाभूत सुविधा पुरवणे, अंगणवाडी इमारतीमध्ये शौचालयाची सुविधा, पिण्याच्या शुद्ध पाण्याची व्यवस्था तसेच अंगणवाडी केंद्राचा परिसर नीटनेटका ठेवण्यासाठी सुंदर माझी अंगणवाडी उपक्रम राबविणे. याबरोबरच अंगणवाडी कर्मचा-यांची सर्व पदे भरणे तसेच अंगणवाडी कार्यकर्ती यांना क्षमता बांधणीचे प्रशिक्षण देऊन दर दोन वर्षाला उजळणी प्रशिक्षण घेण्यात येणार आहे. या माध्यमातून अंगणवाड्यांचे मूल्यांकन करून जिल्ह्यात निवडक पंचतारांकित अंगणवाड्या करण्यात येतील.
पंचतारांकित प्राथमिक आरोग्य केंद्र उपक्रमात जिल्ह्यातील निवडक प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये दर्जात्मक सेवा मिळविण्यासाठी आवश्यक त्या गुणवत्तेसह सुधारणा होणे तसेच लोकाभिमुख पूर्ण क्षमतेने आरोग्यसेवा कार्यान्वित करण्यासाठी पायाभूत सुविधांची उपलब्धता, मनुष्यबळ व्यवस्थापन, लोकसहभागातून आरोग्यसंवर्धन, दर्जेदार व गुणवत्तापूर्वक सेवा, विविध राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांतर्गतची उद्दिष्टपूर्ती व लाभार्थ्यांचे समाधानासह आरोग्य केंद्र खाजगी रुग्णालयासारखे कॉर्पोरेट करणे, विशेषत: रुग्णांच्या समाधानावर याचे मूल्यांकन राहणार आहे.
याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर व मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या पंचतारांकित शाळा, अंगणवाडी व आरोग्य केंद्र या उपक्रमाच्या कृती पुस्तिकेचे विमोचन उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाममंत्री अशोकराव चव्हाण, राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच उपस्थित मान्यवरांना मुलीचे नाव घराची शान उपक्रमांतर्गत घरावर लावण्यासाठीची मुलींच्या नावाची पाटी देण्यात आली.
यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, विधान परिषद सदस्य सतीश चव्हाण, आ. राम पाटील-रातोळीकर, आ. श्यामसुंदर शिंदे, आ. राजेश पवार, अप्पर मुख्य सचिव (नियोजन) देबाशीष चक्रवर्ती, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर, मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर, मनपा आयुक्त डॉ. सुनील लहाने, नियोजन उपायुक्त रवींद्र जगताप, जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर आडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुनील शिंगणे यांच्यासह जिल्ह्यातील विविध विभाग प्रमुखांची उपस्थिती होती.