लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, राष्ट्रमाता जिजाऊ, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पराक्रमांचे, कार्यकर्तृत्वाचे पोवाडे आपल्या विशेष शैलीत सादर करून युवा शाहिरांनी ‘शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण...’ असे म्हणत पहिल्याच दिवशी युवक महोत्सवाच्या वातावरणात स्फूर्ती निर्माण केली़शूर मर्दाची मर्दुमकी काव्यप्रकारातून व आवेशपूर्ण निवेदनातून कथन करून पोवाडा हा लोककला प्रकार स्वारातीम विद्यापीठाच्या आंतर महाविद्यालयीन युवक महोत्सवात सोमवारी दुपारच्या सत्रात सादर झाला़ सहयोग परिसरातील भारतरत्न डॉ़ अटलबिहारी वाजपेयी सभामंडपात हातात डफ धरलेल्या व डोक्यावर फेटा बांधलेल्या स्पर्धक शाहिरांनी ललकारी ठोकत महाराष्ट्राच्या लोककलेची ओळख करून दिली़ दयानंद विधी महाविद्यालय लातूरच्या संघातील शाहीर अपेक्षा डाके हिने छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेला अफजलखानाचा वध हा प्रसंग ताकदीने सादर केला़ आवेशपूर्ण मुद्राभिनयाने व भारदस्त आवाजामुळे या पोवाड्याला वेळोवेळी टाळ्यांचा प्रतिसाद मिळाला़ दयानंद कला महाविद्यालय, लातूरच्या संघाने इथे ओशाळला मृत्यू़़़ हा छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित पोवाडा सादर केला़ या संघातील शाहीर शैलश सरवदे याने संभाजी महाराजांच्या पराक्रमाचे वर्णन आपल्या काव्यातून केले़ लातूरच्याच शाहू महाविद्यालयाच्या शाहीर शुभांगी शिंदे हिने छत्रपती शिवाजी महाराजांची वीरगाथा सादर केली़लातूरच्या जयक्रांती महाविद्यालयाच्या शिरीष बेंबडे याने दहशतवादाचा पोवाडा साजर केला. महात्मा गांधी महाविद्यालय, अहमदपूरच्या ऐश्वर्या पांचाळ हिने राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जीवन चरित्रावर पोवाडा सादर केला. लातूरच्या महात्मा बसवेश्वर महाविद्यालयाच्या प्रगती गवळीने अटलजींची यांच्या संघर्षगाथेवर पोवाडा सादर केला. दयानंद वाणिज्य महाविद्यालय, लातूरच्या संघाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यगाथेवर पोवाडा गायला़ पीपल्स महाविद्यालयाच्या शेख अल्लाउद्दीन यांनी महात्मा फुले यांच्या क्रांती गाथा पोवाड्यातून सादर केल्या. एमजीएम आय.टी. महाविद्यालयाच्या अक्षय वांगणकर याने छत्रपती संभाजी महाराज यांची शौर्य गाथा सादर करून प्रेक्षकांची दाद मिळविली.
शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण़़
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2018 12:42 AM