माहूर (जि.नांदेड) : जगावरील कोरोनाचे संकट दूर होऊ दे. बळीराजासह श्री रेणुकाभक्तांना सुखी, समाधानी होऊ दे. जगात शांतता नांदू दे. देशाच्या रक्षणकर्त्याला उत्तम स्वास्थ लाभू दे व देश सर्वार्थाने संपन्न होऊ दे अशी याचना करून श्री रेणुकामातेस चौथी माळ अर्पण करण्यात आली. श्री रेणुकागडावर पहिल्या माळेपासून वे.शा.सं. रवींद्र कान्नव व त्यांच्या सहकार्यांनी शतचंडी व चतुर्वेद पठण सुरु केले आहे.
मंगळवारी माहूरगडावरील श्री रेणुकादेवी संस्थान येथे अश्विन शुद्ध चतुर्थीला नवरात्र उत्सवाची चौथी माळ मातेस अर्पण करण्यात आली. सकाळी सहा वाजता श्री रेणुकामातेला वेदमंत्रात श्री सूक्त १००८ आवर्तन घालून देवीचा महाअभिषेक करण्यात आला. मातेस लाल रंगाची पैठणी महावस्त्र चढवून शेंदूर लेपन, काजळ लेपन करून श्री यंत्र काढण्यात आले. चौथ्या माळेला मातेची विधीवत पूजा पुजारी भवानीदास भोपी, शुभम भोपी यांच्या हस्ते पार पडली. तर परिवार देवता अभिषेक पूजन व पायस नैवेद्य चंडीकादास भोपी, संभाजी भोपी यांच्या हस्ते अर्पण करण्यात आला. सकाळी ११.३० वाजता महाआरती करण्यात आली. त्यानंतर छबिना काढून परिवार देवतापूजनाचे पूजन मानकरी पवन भोपी, अमित भोपी, समीर भोपी, अश्विन भोपी आदींच्या हस्ते करण्यात आले.