निवघा बाजार (जि. नांदेड) : वडील नसलेल्या भावाने लाडक्या बहिणीचे लग्न जुळविले; परंतु त्याच रात्री भावाने आत्महत्या केल्याने ठरलेले लग्न कसे करावे, असा मोठा प्रश्न तिच्या आईसमोर उभा राहिला आहे.
निवघा बाजार (ता. हदगाव) येथील विकास मोरे हा तरुण गावात मजुरी करून घरगाडा चालवीत असे. घरात आई, बहीण व लहान भाऊ आहे. बहीण उपवर झाल्याने लाडक्या बहिणीसाठी विकासने स्थळ शोधणे सुरू केले. दगडवाडी (ता. हदगाव) येथील युवकाशी २२ जून रोजी सोयरीक जमविली होती व बहीण आशा हिनेही आपला संसार सुखाचा होणार, असे स्वप्न रंगविले होते.
लग्नाची २८ जून ही तारीख निश्चित केली होती; परंतु विकासच्या मनात काय होते देव जाणे़ २२ जून रोजी रात्रीच विकासने येथील सार्वजनिक विहिरीमध्ये उडी घेऊन आत्महत्या केली. आता ठरलेले लग्न कसे करावे, या विवंचनेत आई लताबाई मोरे असून मुलगाच गेल्याने दुहेरी चिंतेत त्या पडल्या आहेत.