धक्कादायक ! हदगावात जिल्हा परिषद शाळेसमोरच होतो अंत्यविधी; भीतीने विद्यार्थी पडतात आजारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2018 03:39 PM2018-04-10T15:39:54+5:302018-04-10T15:48:48+5:30
हदगाव तालुक्यातील बरडशेवाळा (ता़ हदगाव) येथील जिल्हा परिषद शाळेला संरक्षक भिंत नसल्याने विविध अडचणी निर्माण झाल्या आहेत.
- सुनील चौरे
नांदेड : हदगाव तालुक्यातील बरडशेवाळा (ता़ हदगाव) येथील जिल्हा परिषद शाळेला संरक्षक भिंत नसल्याने विविध अडचणी निर्माण झाल्या आहेत. सोमवारी एका महिलेचा शाळेसमोरच अंत्यविधी उरकण्यात आला. यामुळे शाळा वेळेपूर्वीच सोडून द्यावी लागली.
बरडशेवाळा येथील स्मशानभूमी तळ्याच्या काठी असून ती उघड्यावर आहे़ येथे इरिगेशन कॅम्प असल्यामुळे त्या काळी येथे जिल्हा परिषद शाळा बांधण्यात आली़ शाळेच्या बाजूला अंगणवाडीही आहे़ विशेष म्हणजे, शाळा व अंगणवाडी डिजिटल झाली़ शाळेला मैदान असल्यामुळे लहान-लहान विद्यार्थी सकाळ - दुपारच्या दरम्यान खेळत असतात़ शाळेच्या शेजारीच वीटभट्टीचे कारखाने आहेत. यातच शाळेसमोरच स्मशानभूमी आहे. यामुळे येथे विद्यार्थ्यांना अध्ययन करताना अनंत अडचणी येतात.
विद्यार्थ्यांसमोरच होतो अंत्यविधी
शाळेसमोरच स्मशानभूमी आहे. स्मशानभूमीचे अंतर शाळेपासून १०० मीटरपेक्षा कमी आहे. त्यामुळे प्रेतावर अंत्यसंस्कार करताना वर्गात बसलेल्या विद्यार्थ्यांना दिसते़ त्यामुळे विद्यार्थी, पालक व शिक्षकांच्या मनात भीती निर्माण झाली़ स्मशानभूमीचे बांधकाम झाले नाही़ तसेच शाळेलाही संरक्षक भिंत नाही. स्मशानभूमीच्या जागेत बदल करावा,अशी मागणी होत असली याकडे दुर्लक्ष होत आहे. एकूणच हा प्रकार बालमनावर विपरित करणारा असून संबंधितांनी लक्ष देण्याची गरज आहे़ या संदर्भात शाळेतील शिक्षकांनी सरपंच, ग्रामसेवक यांना वारंवार विनंती करून शाळेसमोर अंत्यविधी करू नका असे सूचविले़ मात्र त्यांचे कोणीही ऐकत नाही़
मैदानात बाजारसुद्धा भरतो
याशिवाय शाळेच्या प्रांगणातच सोमवारी सायंकाळी बाजार भरतो़ बाजारानिमित्ताने झालेला कचरा कोणीही उचलत नाही. यासोबतच शाळेच्या बाजूलाच एका स्मशानभूमीचे बांधकाम झाले़ आहे. मात्र तिथे एका विशिष्ट समाजातील व्यक्तींचा अंत्यविधी होतो़ अन्य समाजाच्या स्मशानभूमीलाही ठरावीक जागा आहे़ मात्र एकाचेही काम पूर्ण झालेले नाही़
भीतीमुळे विद्यार्थी पडतात आजारी
बरडशेवाळा येथील विद्यार्थीच शाळेत शिक्षण घेतात़ अंत्यसंस्काराचे वातावरण पाहून शिक्षक लवकर शाळा सोडून देतात़ भीतीमुळे अनेकदा विद्यार्थी आजारीही पडले आहेत
- प्रभाकर दहीभाते, ग्रामस्थ़
गंभीर प्रकार
हा प्रकार गंभीर आहे़ शाळेला संरक्षक भिंत आवश्यक आहे़ त्यासाठी ग्रामपंचायतचा ठराव पंचायत समितीच्या शिक्षण विभागाला अनेकवेळा देण्यात आला़ मात्र कामाला मंजुरी मिळाली नाही
- प्रेम मस्के, ग्रामपंचायत सदस्य़
पूर्वी वस्ती नव्हती, आता वस्ती
स्मशानभूमी परिसरात सुरुवातीला वस्ती नव्हती़ आता वस्ती वाढल्याने ती मध्यभागी झाली़ शाळेला संरक्षक भिंत बांधणे हाच एकमेव उपाय आहे.
- भीमराव नरोटे, ग्रा़ पं़ सदस्य, बरडशेवाळा़
प्रस्ताव मान्यतेसाठी पाठवला
युडायसमध्ये शाळेने संरक्षक भिंतीची मागणी केली होती. आम्ही तो प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठविला़ यावर्षी मान्यता मिळेल
- वैशाली आडगावकर, शिक्षण विस्तार अधिकारी बरडशेवाळा़