बा-हाळीत शॉर्टसर्किटने आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2019 12:44 AM2019-06-23T00:44:27+5:302019-06-23T00:45:59+5:30
येथे शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत एक लाख रुपयांसह सोने-चांदी व संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले़ ही घटना २२ जून रोजी पहाटे दोन वाजता घडली़ या घटनेत घरात गाढ झोपेत असलेले दांपत्य मात्र बालंबाल बचावले.
बा-हाळी : येथे शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत एक लाख रुपयांसह सोने-चांदी व संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले़ ही घटना २२ जून रोजी पहाटे दोन वाजता घडली़ या घटनेत घरात गाढ झोपेत असलेले दांपत्य मात्र बालंबाल बचावले.
येथील विश्वनाथ ज्ञानोबा वाडीकर यांचे वडिलोपार्जित कौलारू घर आहे़ या घरास पूर्णपणे लाकडी छत आहे. नेहमीप्रमाणे नवरा-बायको जेवण करून झोपले असता रात्री दोन वाजनंतर श्वास घेण्यास त्रास होत असल्याने पत्नीला जाग आली. घरात पूर्णपणे धूर पसरल्याने त्यांना काहीही लक्षात आले नाही़ मात्र मागच्या घरातून येणाऱ्या आगीमुळे त्यांच्या डोक्यावरील छत जळत असल्याचे लक्षात येताच त्या बाजूला झोपलेल्या पतीला उठवत असतानाच त्यांच्या अंगावर विस्तवाचे केंडे पडण्यास सुरुवात झाली.
लागलीच कसेबसे दरवाजा काढून नवरा-बायको घराबाहेर आले तोपर्यंत आगीने रौद्र रूप धारण केले होते. आरडाओरड केल्याने आजूबाजूचे नागरिक धावून आले़ मात्र पाण्याची टंचाई असल्याने अनेकजण पिण्यासाठी ठेवलेले पाणी आणून टाकण्याचा केविलवाणा प्रयत्न केला़ पण सर्व काही व्यर्थ गेले़ पहाटे तीन वाजता मुखेड येथील अग्निशमन दलाची गाडी आली व आग विझवली़ तोपर्यंत घरातील संसारोपयोगी साहित्य खाक झाले. घराच्या छतास मोठ्या प्रमाणात लाकडी काम असल्यामुळे आगीने वेग घेतला होता.
घरात ठेवलेले लाख रुपये जळून खाक
या आगीत ७० तोळे चांदी, चार तोळे सोन्याचे पाणी झाले. तसेच मुलांच्या स्पर्धा परीक्षा कोचिंग क्लासेसची फी देण्यासाठी आणून ठेवलेले एक लाख रुपये जागीच जळून खाक झाले. घरातील फ्रीज, टीव्ही, कुलर, कपाट, तांब्याची भांडी, धान्य, कपडे, घरासमोरील टिनपत्रे असे जवळपास सहा लाखांचे नुकसान झाले. विश्वनाथ वाडीकर व त्यांच्या पत्नीच्या अंगावरील कपड्याशिवाय घरातील कुठलीच वस्तू शिल्लक राहिली नाही.