किनवट तालुक्यात सहा प्रकल्प अर्धवट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2018 11:43 PM2018-10-18T23:43:43+5:302018-10-18T23:45:53+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क किनवट : तालुक्यात गेल्या काही वर्षापासून सहा प्रकल्प आजही अर्धवट अवस्थेत आहेत़ परिणामी पडलेल्या एकूण पावसाच्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
किनवट : तालुक्यात गेल्या काही वर्षापासून सहा प्रकल्प आजही अर्धवट अवस्थेत आहेत़ परिणामी पडलेल्या एकूण पावसाच्या ३५ टक्के म्हणजे ४ लाख ३३ हजार ८९० दशलक्ष लिटर (टीसीएम) पाणी वाहून गेले आहे़ त्यामुळे भविष्यातील चिंता वाढली आहे़
किनवट या डोंगराळ, जंगली, दऱ्या खो-याचा भाग असून या तालुक्याचे भौगोलिक क्षेत्रफळ १ लाख ५१ हजार हेक्टर आहे़ वार्षिक पर्जन्यमान सरासरी १ हजार २४० मिलीमीटर इतके आहे़ यंदाच्या पावसाळ्यात सप्टेंबरअखेर ८२१ मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे़ पावसाचे पाणी साठवून ठेवण्याची क्षमता येथील जमिनीत नाही़ खडकाळ जमीन असून पडणारे पाणी अडावे व जीरावे यासाठीचे कोणत्याही विभागाकडून नियोजन नाही़ परिणामी द-याखो-यातील पडणा-या पावसाचे पाणी वाहून जात आहे़
जेथे तेथे पाणी अडवण्यासाठी खूप स्कोप आहे़ जलव्यवस्थापन ही काळाची गरज आहे़ पण दुदैर्वाने मोठे प्रकल्प हाती घेतले जात नाही़ प्रकल्पाला मंजुरी मिळाली तरी काम हाती घेतल्यानंतर वनजमिनीत प्रकल्पाचे काम असल्याची सबब पुढे करून वनविभाग खोडा घालतो़ आजही पाटोदा (खु) बृहत पाटबंधारे तलाव, पांगरी, इस्लापूर, शिवणी, चंद्रपूरचे पाझर तलाव व कनकवाडी येथील साठवण तलाव हे कित्येक वर्षापासून अर्धवट अवस्थेत आहेत़
तज्ज्ञांच्या मते पडणा-या पावसांपैकी १० टक्के पाणी हे भूगर्भात जाते़ म्हणजे १ लाख २३ हजार ९७१ टीसीएम पाणी भूगर्भात गेले़ पडणा-या पावसांपैकी ३५ टक्के पाण्याचे बाष्पीभवन होते़ म्हणजे ४ लाख ३३ हजार ८९० टीसीएम पाण्याचे बाष्पीभवन, वीस टक्के पाणी अडवण्यासाठी निर्माण केलेल्या प्रकल्प, विहिरी, शेततळे व अन्य साठवण्यांच्या ठिकाणी आडते़ म्हणजे झालेल्या ८२१ मिलिमीटर पावसाचे २ लाख ४७ हजार ९४२ टीसीएम पाणी अडवण्यात यशस्वी झाले़ मात्र ३५ टक्के म्हणजे ४ लाख ३३ हजार ८९० टीसीएम पाणी जलव्यवस्थापनाअभावी वाहून गेले आहेत़
विशेषत: इस्लापूर भागातील हे अर्धवट प्रकल्प असून या भागात यंदा पन्नास टक्केच्या आतच पाऊस झाला आहे़ प्रकल्प निर्मिती झाली असती तर पडणा-या पावसाचे पाणी वाहून गेले नसते़ जलयुक्त शिवार अभियानालाही तालुक्यात घरघर लागली आहे़
मागेल त्याला शेततळे ही योजना शासनाची असली तरी शेततळ्यासाठी शासनाची केवळ ५० हजार रुपये तरतूद असल्याने खडकाळ भागात हा निधी अपुरा आह़े परिणामी शेतकरी मागेल त्याला शेततळे या योजनेकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे़किनवट तालुक्यात बहुतांश भागात छोटे मोठे नाले आहेत़ या नाल्यावर मध्यम प्रकल्प, साठवण तलाव, पाझरतलाव व कोल्हापुरी बंधारे बांधकामासाठी जागाही आहे़ पैनगंगा नदीवर आ़प्रदीप नाईक यांच्या प्रयत्नाने उच्च पातळी बंधारे निर्माण कार्य सुरू आहे़
- १ लाख ५१ हजार क्षेत्रावर सप्टेंबर अखेर पडणा-या पावसाच्या १२ लाख ३९ हजार ७१० टीसीएम पाण्यांपैकी ४ लाख ३३ हजार ८९० दशलक्ष टीसीएम पाणी वाहून गेल्याने हे पाणी अडवण्यासाठी उपक्रम राबविले असते तर तालुका सुजलाम सुफलाम झाला असता़