१३ लाख हेक्टरवरील कपाशीची पेरणी खाेळंबली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:14 AM2021-07-11T04:14:28+5:302021-07-11T04:14:28+5:30
नांदेड : यावर्षी पावसामुळे राज्यातील पेरण्या लांबल्या आहेत. अनेक ठिकाणी दुबार पेरणीची परिस्थिती निर्माण झाली आहे. नगदी पीक म्हणून ...
नांदेड : यावर्षी पावसामुळे राज्यातील पेरण्या लांबल्या आहेत. अनेक ठिकाणी दुबार पेरणीची परिस्थिती निर्माण झाली आहे. नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या केवळ कपाशीचा विचार केल्यास आतापर्यंत गेल्या वर्षीच्या तुलनेत १३ लाख हेक्टर क्षेत्रातील कपाशीची पेरणी खाेळंबली आहे. ते पाहता यावर्षी कपाशीचा पेरा घटण्याचा अंदाज काॅटन काॅर्पाेरेशन ऑफ इंडियाने (सीसीआय) वर्तविला आहे. गेल्या वर्षी राज्यात ४३ लाख हेक्टर क्षेत्रात कपाशीची लागवड करण्यात आली हाेती. परंतु, या वर्षी पावसाने उघडीप दिल्याने आतापर्यंत केवळ ३० लाख हेक्टर क्षेत्रात कपाशीची लागवड झाली आहे. साेयाबीनला चांगला भाव मिळाल्याने शेतकऱ्यांचा कल कपाशीऐवजी साेयाबीन लागवडीकडे अधिक दिसताे आहे. कपाशीची लागवड कमी हाेऊन टंचाई निर्माण झाल्यास यंदाच्या हंगामात कपाशीला बाजारात चांगला भाव मिळण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. कपाशीला बाजारात ६ हजार ७५० रुपये भाव मिळताे आहे. हमीभावातही २०० रुपयांनी वाढ झाली आहे. कपाशीच्या पेऱ्यात नेमकी किती घट हाेईल हे पुढील दाेन आठवड्यांत स्पष्ट हाेणार आहे. शिवाय बाजारावर काेराेनाच्या तिसऱ्या लाटेचे सावटही पाहायला मिळत आहे.
गेल्या वर्षी काेराेना व लाॅकडाऊनमुळे शेतकऱ्यांचा कापूस घरातच राहिला हाेता. परंतु, यावर्षी खबरदारी म्हणून सुरुवातीलाच शेतकऱ्यांनी कापूस विक्रीसाठी घराबाहेर काढला.
चाैकट......
सीसीआयची खरेदीही घटली......
सीसीआयने गेल्या वर्षी राज्यात खरेदी केलेल्या कापसातून २७ लाख गाठी तयार केल्या हाेत्या. या वर्षीच्या हंगामात ही संख्या घटून १७ लाख गाठी एवढी झाली आहे. यावरून सीसीआयला कमी कापूस विकला गेल्याचे स्पष्ट हाेते. या सर्व १७ लाख गाठी विकल्या गेल्या आहेत.
काेट.....
या खरीप हंगामात कापसाचा पेरा कमी हाेण्याचा अंदाज आहे. लांबलेला पाऊस व साेयाबीनला मिळणारा अधिक भाव ही प्रमुख कारणे त्यामागे आहेत. कमी लागवड झाल्यास बाजारात कापसाला चांगला भाव मिळण्याची शक्यता आहे.
- एस. के. पाणीग्रही,
मुख्य महाव्यवस्थापक,
सीसीआय, मुंबई