नांदेड : अतिवृष्ष्टी आणि पुरामुळे ३ लाख ६१ हजार १२८ हेक्टर क्षेत्रातील पीकांना फटका बसला असून, जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या कालावधीत ३३ टक्क्यांहून अधिक नुकसान झालेल्या पिकांमध्ये सर्वाधिक फटका हा सोयाबीनला बसला आहे.
जिल्ह्यात २ लाख ७३ हजार ३१२ हेक्टर क्षेत्रातील सोयाबीन पिकाचे नुकसान ३३ टक्क्यांहून अधिक आहे. त्याखालोखाल अतिवृष्टीचा फटका कापूस या दुसरर्या गदी पिकाला बसला आहे. जिल्ह्यात ५७ हजार १९० हेक्टर कापसाचे क्षेत्र बाधित झाले आहे. नायगाव, मुदखेड, किनवट आणि माहूर या तालुक्यात मात्र कापसाचे नुकसान निरंक आहे. ज्वारीचे १४ हजार ३६४.२५ हेक्टर क्षेत्र तर तुरीचे ७ हजार १७६.१५ हेक्टर क्षेत्र पावसाने बाधित झाले आहे. जिल्ह्यात जून ते सप्टेंबरच्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले असले तरी परतीच्या पावसानेही मोठ्या प्रमाणात झोडपले आहे.
याचा फटका काढणीस आलेल्या पिकांना बसला आहे. शेतातील पीक आता पाण्यात उभी आहेत. ऑक्टोबरमध्ये झालेल्या नुकसानीचेही पंचनामे करून एकत्रित अहवाल सादर करण्याचे निर्देश शासनाने महसूल विभागाला दिले आहेत. त्यामुळे पंचनाम्यांचे काम सुरूच राहिल असेही निवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी यांनी सष्ट केले आहे. जिल्ह्यात खरीप हंगामात ७ लाख ६२ हजार १५८ हेक्टर क्षेत्रात एकूण पेरणी झाली होती. त्यातील साडेतीन लाखाहून हेक्टर क्षेत्राला पावसाचा फटका बसला आहे. या नुकसानी पोटी जिल्हा प्रशासनाने २४६ कोटी ३७ लाख २९ हजार २५६ रुपयांची मागणी केली आहे.
हातातोंडाशी आलेला घास हिरावलाहदगाव तालुक्यातील चाभरा येथे साडेतीन एकर शेतात सोयाबीन पेरले होते. या सोयाबीनमधून अंदाजे सव्वा लाख रुपये उत्पन्न होईल अशी अपेक्षा होती. सोयाबीनसाठी बियाणे, खते, औषधीसाठी पोटाला चिमटा घेवून २५ ते ३० खर्च करण्यात आला होता. यासाठी पीक कर्जही घेतले होते. आता कर्ज कसे फेडावे ही चिंता आहे. - सुदर्शन कल्याणकरशेतकरी, चाभरा, ता.हदगाव
काढणीचा खर्च अधिकनगदी पीक म्हणून सोयाबीनची चार एकरमध्ये पेरणी केली. यासाठी जवळपास ४० ते ५० हजार रुपये खचर्च झाला. बी-बियाणे, औषधीचा खर्च उत्पन्नातून भागेल अशी अपेक्षा हेाती. मात्र शेंगा वाळल्यानंतर पाऊस झाला अन् शेतातील उभ्या पीकांना मोड फुटले. आता रब्बीची पेरणी कशी करावी याची चिंता आहे. - दिगांबर टिपरसे, शेतकरी, बारड, ता.मुदखेड
महसूल व कृषी विभागाचे पंचनामे जिल्हाभरात अंतिम टप्यातकृषी व महसूल विभाग तसेच विमा कंपनीच्या प्रतिनिधीच्या उपस्थितीत पंचनामे केले जात आहेत. सप्टेंबर अखेरपर्यतचे पंचनामे पूर्ण झाले असून, अहवाल शासनाला पाठविण्यात आला आहे. ऑक्टोबर महिन्यातही परतीच्या पावसाने खरीप पीकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान सुरुच आहे. त्यामुळे शासनाच्या आदेशा प्रमाणे ऑक्टोबरमधील नुकसानीचेही पंचनामे केले जात असल्याचे जिल्हा कृषी अधीक्षक आर.बी.चलवदे यांनी सांगितले.