नांदेड : मराठवाडा मुक्ती संग्राम दिन आणि स्वामी रामानंद मराठवाडा विद्यापीठाच्या वर्धापन दिनानिमित्ताने दिल्या जाणारा विविध पुरस्कारांची सोमवारी विद्यापीठाच्या वतीने घोषणा करण्यात आली़ डॉ़व्यंकटेश काब्दे यांना जीवनसाधना गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असून १२ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजता पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे.
विद्यापीठाच्या वतीने जीवनभर विशेष उल्लेखनीय योगदान देणाऱ्या विद्यापीठ कार्यक्षेत्रातील व्यक्तीची 'जीवनसाधना गौरव' पुरस्कारासाठी निवड करण्यात येते़ यावर्षी हा पुरस्कार डॉ. व्यंकटेश रुकमाजी काब्दे यांना जाहीर करण्यात आला आहे़ मानपत्र, विद्यापीठ स्मृतीचिन्ह आणि रोख २५,००० रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे़
उत्कृष्ट महाविद्यालय शहरी विभागाचा पुरस्कार नांदेड येथील नांदेड एज्युकेशन सोसायटीचे सायन्स कॉलेजला मिळाला. या पुरस्काराचे स्वरूप सन्मानपत्र, विद्यापीठ स्मृतीचिन्ह आणि रोख २५,००० रुपये असे आहे. तर ग्रामीण विभागाचा पुरस्कार भोकर येथील कै.दिगंबरराव बिंदू स्मारक समितीचे, दिगंबरराव बिंदू कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयास मिळाला आहे. पुरस्काराचे स्वरूप सन्मानपत्र, विद्यापीठ स्मृतीचिन्ह आणि रोख २५,००० रुपये असे आहे.
उत्कृष्ट प्राचार्य ग्रामीण विभागाचा पुरस्कार सेलूच्या नूतन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एस. कुलकर्णी यांना जाहीर झाला आहे. पुरस्काराचे स्वरूप सन्मानपत्र, विद्यापीठ स्मृतीचिन्ह आणि रोख १५,००० रुपये असे आहे. उत्कृष्ट शिक्षक शहरी विभागाचा पुरस्कार नांदेडच्या श्री गुरु गोविंद सिंघजी अभियांत्रिकी व तंत्रशास्त्र संस्थेतील डॉ. एस. एन. तलबार यांना जाहीर झाला तर उत्कृष्ट शिक्षक ग्रामीण विभागाचा पुरस्कार रेणापूरच्या शिवाजी महाविद्यालयातील डॉ. एस. व्ही. यादव आणि बाभळगाव, (ता.लातूर) येथील कै. व्यंकटराव देशमुख महविद्यालयातील डॉ. डी. एम. कटारे यांना विभागून मिळाला आहे. पुरस्काराचे स्वरूप सन्मानपत्र, विद्यापीठ स्मृतीचिन्ह आणि रोख ५,००० रुपये प्रत्येकी असे आहे. विद्यापीठ परिसरातील संकुलीय शिक्षक पुरस्कार वाणिज्य व व्यवस्थापनशास्त्रे संकुलातील डॉ. डी. एम. खंदारे यांना देण्यात येणार आहे. पुरस्काराचे स्वरूप सन्मानपत्र, विद्यापीठ स्मृतीचिन्ह आणि रोख १०,००० रुपये असे आहे.
उत्कृष्ट प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी पुरस्कार विद्यापीठ परिसरातील वर्ग एकचा पुरस्कार उपकुलसचिव डॉ.श्रीकांत अंधारे यांना तर वर्ग दोनचा पुरस्कार अधीक्षक अनिरुद्ध राहेगांवकर यांना देण्यात येणार आहे. वर्ग तीनच्या दोन पुरस्कारापैकी एक पुरस्कार वाहन चालक सिद्धीकी शेरखान पठाण यांना तर दुसरा पुरस्कार लघुलेखक (उ.श्रे.) रामदास साळुंके आणि वरिष्ठ लिपिक पी.डब्ल्यू. पावडे यांना विभागून देण्यात येणार आहे तर वर्ग चारच्या दोन पुरस्कारापैकी पहिला पुरस्कार दत्ता हंबर्डे यांना तर दुसरा सुभाष गाभणे यांना जाहीर झाला आहे.
वित्त व लेखा विभागामार्फत देण्यात येणारा यावषीर्चा लेखा विभागाचा उत्कृष्ट कर्मचारी पुरस्कार सहा.अधीक्षक रमेश राजपूत यांना जाहीर झाला आहे. विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयातील कार्यरत गुणवंत कर्मचाऱ्यांना देण्यात येणारा वर्ग तीनचा उत्कृष्ट शिक्षकेत्तर कर्मचाऱ्याचा पुरस्कार शिवाजी महाविद्यालय, उदगीरचे सहा.ग्रंथपाल रघुनाथ आडे आणि शिवनेरी महाविद्यालय, शिरूर अनंतपाळचे मुख्य लिपिक विजय जागले यांना विभागून तर वर्ग चारचा शिवनेरी महाविद्यालय, शिरूर अनंतपाळच्या संजय सूर्यवंशी यांना जाहीर झाला आहे.
१२ डिसेंबर २०१८ रोजी दुपारी ४.०० वाजता विद्यापीठाच्या अधिसभा सभागृहामध्ये संपन्न होणाऱ्या या पुरस्कार वितरण सोहळ्यास ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती राहणार असून अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले राहतील, असे विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. रमजान मुलाणी यांनी कळविले आहे.