- भारत दाढेल
नांदेड : जिल्ह्यातील माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (दहावी) परीक्षेचा शैक्षणिक वर्ष २०२०-२१ चा निकाल शुक्रवारी जाहीर झाला आहे. नांदेड जिल्ह्याचा निकाल ९९.५४ टक्के एवढा लागला असून ४७ हजार ११८ विद्यार्थी दहावी परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत.
नांदेड जिल्ह्याचा दहावी परीक्षेचा निकाल एवढ्या मोठ्या प्रमाणात लागण्याची ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी गतवर्षात ८५ टक्के एवढा निकाल लागला होता. दरम्यान, शुक्रवारी जाहीर झालेल्या निकालात २६ हजार ४२ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले आहेत. प्रथम श्रेणीत १७ हजार ३८३ तर द्वितीय श्रेणीत १ हजार ३९९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. मार्च महिन्यात होणाऱ्या इयत्ता दहावीच्या परीक्षा कोरोनामुळे रद्द झाल्या होत्या. त्यानंतर राज्य शासनाने विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्यासाठी मुल्यमापन पद्धतीचा अवलंब करत परीक्षा न घेता निकाल जाहीर केले आहेत.
सर्व्हर डाऊन असल्याने हिरमोड पहिल्यांदा परीक्षा न देता हजारो विद्यार्थी दहावी परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. परंतु, हा निकाल पाहण्यासाठी उत्साहाने नेटकॅफेवर गेलेल्या हजारो विद्यार्थ्यांचा सर्व्हर डाऊन असल्याने हिरमोड झाला आहे. परीक्षा न देता पास झाल्याचा आनंद अनेकांच्या चेहऱ्यावर होता. तर काही अभ्यासू विद्यार्थ्यांना अपेक्षेपेक्षा कमी गुण आल्याने निराश झाले. दरम्यान, एकाच वेळी निकाल पाहणाऱ्यांची संख्या अधिक असल्याने सर्व्हरवर लोड येवून निकालाचे संकेतस्थळ बंद पडले आहे. बराच वेळ सर्च केल्यानंतर निकाल दाखवत असल्याचे शैक्षणिक सल्लागार गजानन मोरे यांनी सांगितले.