गडग्यातील चोरी झालेले एटीएम मशीन तब्बल १७ दिवसांनंतर सापडले; रक्कमही सुरक्षित - A
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 04:33 AM2021-02-21T04:33:33+5:302021-02-21T04:33:33+5:30
गडगा बसथांबा परिसरातील बालाजीराव धोंडीबा एकाळे यांच्या जागेत टाटा इंडीकॅश कंपनीचे एटीएम आहे. दरम्यान, ३ फेब्रुवारीच्या मध्यरात्रीपासून ते ४ ...
गडगा बसथांबा परिसरातील बालाजीराव धोंडीबा एकाळे यांच्या जागेत टाटा इंडीकॅश कंपनीचे एटीएम आहे. दरम्यान, ३ फेब्रुवारीच्या मध्यरात्रीपासून ते ४ फेब्रुवारीच्या पहाटे पाच यावेळेच्या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी एटीएम मशीन तोडफोड करून पळविली होती. चोरीच्या घटनेची माहिती जागामालक एकाळे यांनी नायगाव पोलिसांना दिली. त्यानंतर घटनास्थळी नांदेडहून श्वानपथक, ठसेतज्ज्ञांच्या पथकाने पाहणी केली होती. परंतु, याप्रकरणी संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांनी चोरीची तक्रार देण्यासाठी विलंब केला.
दरम्यान, १९ फेब्रुवारी रोजी गडग्याच्यानजीक असलेल्या पुलात दुपारच्या वेळी गडगा येथील संतोष बालाजीराव खुजडे या युवकाच्या निदर्शनास लोखंडी पेटीसारखी वस्तू दिसून आली. त्यांनी ही बाब बालाजीराव एकाळे यांना सांगितली. त्यांनी लगेचच नायगाव पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळी पोलीस निरीक्षक रमाकांत पडवळ, पोलीस हेडकाॅन्स्टेबल वळगे, एएसआय आनंद वाघमारे हे पोलीस ताफा घेऊन दाखल झाले. एका जेसीबीच्या सहाय्याने एटीएम मशीन उचलून ती एकाळे यांच्या दुकानासमोर सायंकाळी सहा ते सात वाजेपर्यंत ग्रामस्थांच्या समक्ष इनकॅमेरा फोडण्याची कार्यवाही केली असता, मशीनच्या तिजोरीत ३ लक्ष ९१ हजार १०० रुपये एवढी रक्कम आढळून आली.
कंपनीच्या तक्रार बॅलन्ससीटमध्ये देखील तेवढ्याच रकमेची नोंद असल्याचे दिसून आले. या प्रकरणी पोलिसांनी पंचनामा करून रक्कम ताब्यात घेतली आहे. ही कार्यवाही चालू असताना बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. ती पांगवताना पोलिसांच्या नाकीनऊ येत होते. मशीनसह रक्कम मिळाली पण चोरटे कोण होते? याचा तपास लावण्याचे आव्हान पोलिसांसमोर कायम आहे.