मुक्रमाबाद : मुक्रमाबाद येथील १३१० घराचा मावेजा देण्यास सुरुवात होवून २० तारखेनंतर धरणाच्या कामास सुरु होणार असल्याची माहिती मिळताच ११ गावातील धरणग्रस्त खडबडून जागे झाले. शासनाच्या निर्णयाचा विरोध म्हणून गुरुवारी दुपारी धरण परिसरात गोळा झाले. यावेळी आ.डॉ. तुषार राठोड, शेतकरी संघटनेचे नेते गुणवंत पाटील हंगरगेकर उपस्थित होते.
लेंडी धरणात जात असलेल्या रावणगाव, भाटापूर, गोणेगाव, इडग्याळ, कोळणूर, मारजवाडी, वंळकी, डोरणाळी आदी गावातील धरणग्रस्ताना मावेजा २०१३ च्या कायद्यानुसार दिला जावा, तोपर्यंत काम सुरु नये. जोपर्यंत शेतकऱ्यांना २०१३-१४ च्या कायद्यान्वये शेतीचा वाढीव मावेजा शासन देणार नाही, तोपर्यंत धरणाचे एक इंचही काम होवू देणार नाही, अशी भूमिका यावेळी आ. राठोड यांनी घेतली. यावेळी सरपंच राजू पाटील रावणगावकर, हणमंत पाटील भासवाडीकर, बाळासाहेब देशमुख, बालाजी पाटील, जफर पटेल, शादूल पाटील, जैनुद्दीन पटेल, रमेश खंडागळे रामेश्वर आप्पा, बालाजी पाटील, शिवाजी पाटील, शंकर पाटील.पप्पू हासनाळे उपस्थित होते.
वाढीव मावेजासाठी शेतकरी भांडत असताना केवळ श्रेयवादाच्या कारणाने मावेजा मिळाला नाही.ही दुर्देवाची बाब आहे. शासनाने मुक्रमाबाद प्रकल्पग्रस्तांना वाढीव मावेजा देऊन स्वेच्छा पुनर्वसनासाठी रततूद केली. त्याप्रमाणे शासनाने ११ गावातील प्रकल्पग्रस्तांना २०१३-१४ प्रमाणे वाढीव मावेजा देऊनच धरणाच्या बांधकामाला सुरूवात करावी अन्यथा होणाऱ्या गंभीर परिणामास सरकारने तयार राहावे, असा इशारा राठोड यांनी दिला. येत्या २३मार्च पर्यत सरकारने जर आम्हांला वाढीव मावेजा देऊन पुनर्वसाची कामे पूर्णत्वास नेली नाहीत तर येत्या २३ मार्चला लेंडी धरणावर हातोडा महामोर्चा काढून धरणाचे झालेले बांधकाम पूर्ण पाडण्यात येईल, यात आमचा जीव गेला तरी चालेल, असेही यावेळी राठोड म्हणाले. यावेळी १००० च्यावर पुरुष व महिला धरणग्रस्त उपस्थित होते