नांदेड : सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत रस्ते दुरुस्तीच्या कामाचे कंत्राट दिलेल्या कंत्राटदारांनी शासकीय कंपनीकडून डांबर खरेदी न करता ते खाजगी व्यक्तीकडून केले़ त्यानंतर डांबर शासकीय कंपनीकडूनच खरेदी केल्याच्या बनावट पावत्या लावून बिले उचलल्याचा प्रकार उघडकीस आला होता़ या प्रकरणात पाच कंत्राटदारांच्या विरोधात यापूर्वीच गुन्हा नोंदविण्यात आला आहे़ त्यातील एस़जी़पद्मावार यांच्या विरोधात आणखी एक गुन्हा नोंद झाला आहे़ त्यामुळे डांबर घोटाळ्यात पद्मवार यांचा पाय आणखी खोलात गेला आहे़सार्वजनिक बांधकाम विभागाने जिल्ह्यातील अनेक कंत्राटदारांना रस्ते दुरुस्तीचे काम दिले होते़ हे काम देताना त्यासाठी वापरण्यात येणारे डांबर हे शासकीय कंपनीकडूनच खरेदी करण्यात यावे, अशी अट घालण्यात आली होती़ परंतु कंत्राटदारांनी खाजगी व्यक्तीकडून कमी किमतीत मिळणारे डांबर खरेदी करुन रस्त्याची कामे केली़त्यातून त्यांना मोठा फायदा झाला़ परंतु बांधकाम विभागाकडे बिले सादर करताना त्यांनी डांबर शासकीय कंपनीकडूनच खरेदी करण्यात आले असल्याची बोगस बिले लावली़ त्याआधारे रस्ता कामाची बिलेही उचलली़ याबाबत बांधकाम विभागाने चौकशी केली असता ही बाब उघडकीस आली होती़ या कामामध्ये जवळपास १२ कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर साहाय्यक अभियंता संदीप कोटलवार यांच्या तक्रारीवरुन काही महिन्यांपूर्वीच सहा कंत्राटदारांच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता़ त्यातील एका कंत्राटदाराचे नाव पुन्हा वगळण्यात आले होते़ तर इतरांना मात्र तुरुंगात रहावे लागले होते़यातील चार कंत्राटदारांना आतापर्यंत अटक करण्यात आली असून त्यांना जामीनही मिळाला आहे़ तर या गुन्ह्यात सहभागी असलेल्या एसक़े़पद्मावार यांच्याविरोधात आणखी एक गुन्हा शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे़ या प्रकरणाचा तपास पोउपनि काळे यांच्याकडे देण्यात आला आहे़ त्यामुळे डांबर घोटाळ्यात पद्मावार यांच्या अडचणीत भर पडली आहे़
डांबर घोटाळ्यात कंत्राटदार पद्मावारांचा पाय खोलात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2019 12:07 AM
सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत रस्ते दुरुस्तीच्या कामाचे कंत्राट दिलेल्या कंत्राटदारांनी शासकीय कंपनीकडून डांबर खरेदी न करता ते खाजगी व्यक्तीकडून केले़ त्यानंतर डांबर शासकीय कंपनीकडूनच खरेदी केल्याच्या बनावट पावत्या लावून बिले उचलल्याचा प्रकार उघडकीस आला होता़
ठळक मुद्देआणखी एक गुन्हा : घोटाळ्याची व्याप्ती वाढली