सांगा, आम्ही कसं शिकायचं!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2019 12:26 AM2019-06-17T00:26:51+5:302019-06-17T00:28:14+5:30
आजपासून शाळा गजबजणार आहेत. मात्र विद्यार्थ्यांना याहीवर्षी धोकादायक इमारतीतच शिक्षणाचे धडे गिरवावे लागणार आहेत. विशेष म्हणजे, शाळा दुरुस्तीसाठी निधी प्राप्त होऊन तब्बल दीड वर्षांचा कालावधी लोटला आहे. मात्र पदाधिकाºयातील राजकारण आणि ढिम्म असलेले प्रशासन यामुळे दुरुस्तीचा प्रश्न ‘जैसे थे’ आहे.
विशाल सोनटक्के।
नांदेड : आजपासून शाळा गजबजणार आहेत. मात्र विद्यार्थ्यांना याहीवर्षी धोकादायक इमारतीतच शिक्षणाचे धडे गिरवावे लागणार आहेत. विशेष म्हणजे, शाळा दुरुस्तीसाठी निधी प्राप्त होऊन तब्बल दीड वर्षांचा कालावधी लोटला आहे. मात्र पदाधिकाºयातील राजकारण आणि ढिम्म असलेले प्रशासन यामुळे दुरुस्तीचा प्रश्न ‘जैसे थे’ आहे. वर्गखोल्यांच्या दुरुस्तीसाठी पहिल्या टप्प्यात १ कोटी १८ लाख ६ हजार रुपये तर दुसºया टप्प्यातील दुरुस्तीसाठी १ कोटी ९२ लाख ५९ हजार रुपये निधी वाटप करण्यात आला आहे. किमान आतातरी उर्वरित प्रक्रिया पूर्ण करुन शाळा दुरुस्तीच्या कामांना वेग द्यायला हवा. प्रशासनासह पदाधिकारी याबाबत पुढाकार घेणार का? असा सवाल उपस्थित होत आहे.
जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने सुमारे दीड वर्षांपूर्वी जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या ४२८ शाळांचे स्ट्रक्चरल आॅडीट केले होते. या आॅडीटमध्ये ८७६ वर्गखोल्या धोकादायक स्थितीत असल्याचे पुढे आले होते. यातील ५७४ वर्गखोल्या पाडण्याइतपत नादुरुस्त आहेत तर २७० वर्गखोल्यांची दुरुस्ती करणे आवश्यक असल्याचे या अहवालात स्पष्टपणे नमूद करण्यात आले होते. मात्र तब्बल दोन वर्षे उलटत आली तरी शाळा दुरुस्तीचे हे प्रकरण कागदावरच आहे. त्यामुळेच अक्षरश: जीव मुठीत घेवून हजारो विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे गिरवावे लागत आहेत.
जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांच्या वर्गखोल्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाल्याच्या तक्रारी होत्या. विशेष म्हणजे, याच मोडकळीस आलेल्या वर्गखोल्यात विद्यार्थी शिक्षण घेत असल्याने सर्वसाधारण सभेत जिल्हा परिषद सदस्यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. हा प्रश्न सातत्याने लावून घेतल्यांतर जिल्ह्यातील सर्वच शाळांचे स्ट्रक्चरल आॅडीट करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
या निर्णयानुसार जिल्हा परिषद बांधकाम विभागाने स्ट्रक्चरल आॅडीट सादर केले. यातील पाडण्यायोग्य व दुरुस्तीयोग्य शाळा या तब्बल ४० ते ५० वर्षे जुने असून यातील अनेक वर्गखोल्या जीर्ण झालेल्या असल्याचे दिसून आले. पावसाळ्यामध्ये तर अनेक वर्गखोल्यांना गळती लागते. तर काही खोल्यांच्या भिंतीत पाणी झिरपत असल्याने विद्यार्थ्यांना वर्गखोल्यात बसणेही मुश्किल होत असल्याचे आॅडीटच्यावेळी निदर्शनास आले होते.
बांधकाम विभागाने केलेले हे आॅडीट सादर झाल्यानंतर दुरुस्तीसाठी जिल्हा नियोजन समितीतर्फे साडेचार कोटींचा निधी उपलब्ध करण्यात आला. मात्र त्यानंतरही दुरुस्ती होऊ शकली नाही. वर्गखोल्यात दुरुस्तीचे काम प्राप्त निधीनुसार काही टप्प्यात करणे आवश्यक होते. त्यातच पहिल्या टप्प्यात आपल्या भागातील वर्गखोल्यांची दुरुस्ती व्हावी, असा जिल्हा परिषद सदस्यांचा आग्रह होता. या वादामुळे निधी प्राप्त असूनही दुरुस्तीसाठीची प्रक्रिया रखडली. दरम्यानच्या काळात काही जि.प. सदस्यांनी या वर्गखोल्यांचे पुन्हा आॅडीट करण्याची मागणी केली. मात्र पुन्हा आॅडीट करण्यासाठी पुरेशी यंत्रणा नसल्याचे बांधकाम विभागाचे म्हणणे होते. वर्गखोल्यांच्या दुरुस्तीवरुन असा गोंधळ सुरू असतानाच लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आणि दुरुस्तीचा हा विषय बाजूला पडला. सध्या वर्गखोल्या दुरुस्तीच्या कामासाठी निधीचे वाटप करण्यात आलेले आहे. पहिल्या टप्प्यात १ कोटी १८ लाख ६ हजार रुपये खर्चून २२ माध्यमिक शाळातील खोल्यांची दुरुस्ती होणार आहे तर दुसºया टप्प्यात १ कोटी ९२ लाख ५९ हजार रुपये खर्चून ९३ प्राथमिक शाळातील वर्गखोल्यांची दुरुस्ती होणार आहे. प्रत्यक्षात ही कामे केव्हा सुरू होणार? याची प्रतीक्षा दीड वर्षानंतरही कायम आहे.
शाळाचे भग्नावशेष उरले
हिमायतनगर शहरातील एकेकाळी नावाजलेली जिल्हा परिषद हायस्कूलची आज जीर्ण अवस्था झाली आहे. हिमायतनगर तालुक्यात एकूण जिल्हा परिषद शाळेची संख्या ११० असून शहरातील जिल्हा परिषद हायस्कूल येथे मराठी माध्यम आणि उर्दू माध्यम आहे़ पाचवी ते दहावीच्या वर्गापर्यंत भरत असलेल्या शाळेला एक चांगली इमारत आहे़ आणि मराठी माध्यम चौथीपर्यंत शाळा मध्यवर्ती बँकेच्या बाजूला मातीच्या इमारतीत भरत असून ती इमारत अगदी जीर्ण झाली़ अनेक भिंती पडल्या आहेत़
२९ विद्यार्थी अन् २ शिक्षक
पूर्वीचे मातीचे बांधकाम असल्याने आता ते पूर्ण पडण्याच्या स्थितीत असून पालक वर्ग त्या शाळेत मुलांना टाकण्यासाठी घाबरत असल्याने पटसंख्या कमी झाली आहे़ चौथीपर्यंत केवळ २९ विद्यार्थी आणि दोन शिक्षक असल्याचे सांगितले आहे़ यावेळी मुख्याध्यापक शे.खमर यांच्याशी फोनवर बोलणे झाले असता ते म्हणाले, सदरील शाळेच्या इमारतीचे बांधकाम न होण्याचे कारण त्या शाळेच्या जागेचे काहीतरी प्रकरण आहे़ त्यामुळे बांधकाम झाले नाही असे सांगितले आहे.
पडकी शाळा म्हणून ओळख
या शाळेची इमारत अगदी जीर्ण झाल्याने विद्यार्थ्यांच्या जिवाला धोका निर्माण होण्याचे संकेत नागरिक सांगितले असून त्या शाळेला पडकी जिल्हा परिषद शाळा म्हणून ओळखले जाते़ या शाळेत विद्यार्थी जीव मुठीत घेवून शिक्षण घेतात़ इमारतीचे छतही गायब झाले असून पावसाळ्याच्या काळात तर अनेकवेळा शाळेला सुटी देण्यात येते़ त्यामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात जाण्याची शक्यता आहे़
शाळेवर मोडके टीनपत्रे
मांडवी- नेहमी कोणत्याही शैक्षणिक कार्यक्रमात अगे्रसर असलेल्या जि.प.केंद्रीय शाळा पळशीला आता दुरवस्थेचे ग्रहण लागले आहे़ येथे उपलब्ध सहा वर्गखोल्यांपैकी एक - दोन वर्गखोल्यांचा वापर होत आहे़ इतर खोल्यांवरील टिनपत्रे उडाली असून दारे खिडक्या नाहीत़ तसेच शाळेला आवार भिंत नाही़ भौतिक सोई -सुविधांचाही अभाव आहे़ परिणामी विद्यार्थीसंख्या घटली आहे़ मांडवी या शैक्षणिक बिटात एकूण ३३ जि.प.शाळांचा समावेश आह़े त्यात पळशी, पाटोदा, कनकी तांडा या तीन केंद्रीय शाळा आहेत़ जवळपास १७०० एवढी विद्यार्थी संख्या आहे़ पाठ्यपुस्तके आणि गणवेश मोफत मिळते म्हणून गोरगरीब पालक आपल्या मुलांना जि.प. शाळेत पाठवितात़ या विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण देण्यासाठी या बिटात १०२ शिक्षक नेमलेले आहेत़ सोयीसुविधा नसल्यामुळे त्याच्या परिणाम थेट विद्यार्थी गळतीवर झाला आहे़ कनकी तांडा केंद्रातील -जरुर खेडी, पिंपळगाव फाटा, मिनकी येथील जि.प.शाळा या विद्यार्थी नाहीत म्हणून बंद पडल्या आहेत़ तसेच पाटोदा केंद्रात लेंडीगुडा ही गतवर्षी तर यंदा कोलामपेठची शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहे.
या बिटातील पळशी केंद्रात जि.प.हायस्कूल मांडवी वगळता १२ शाळांचा समावेश आहे़ त्यात ४१६ मुले तर ४२० मुलींचा समावेश आहे. एकूण ८३६ विद्यार्थी पटनोंदणी आहे़ अनेक गरीब, होतकरु विद्यार्थ्यांना घडविलेल्या पळशी जि.प.शाळेत आता १९ विद्यार्थी आहेत़ त्यात मुले ९ तर १० मुली आहेत़ त्यांच्यासाठी शिक्षक संख्या ३ आहे़ येथील शाळा भर पावसाळ्यात मोडकळीस येणार ही धोक्याची घंटा देत आहे .