गोवर-रुबेलाकडे उर्दू शाळांनी फिरविली पाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2018 12:14 AM2018-12-10T00:14:26+5:302018-12-10T00:16:19+5:30
बालकांना गोवर आणि रुबेला या रोगापासून बचावासाठी देण्यात येणाऱ्या गोवर-रुबेला या लसीकरण मोहिमेत उर्दू शाळांचा प्रतिसाद मिळत नसल्याची बाब पुढे आली आहे.
नांदेड : बालकांना गोवर आणि रुबेला या रोगापासून बचावासाठी देण्यात येणाऱ्या गोवर-रुबेला या लसीकरण मोहिमेत उर्दू शाळांचा प्रतिसाद मिळत नसल्याची बाब पुढे आली आहे. इतकेच नव्हे, तर चैैतन्यनगर येथील सना हायस्कूलने तर स्पष्टपणे असहकारच केल्याने महापालिकेने याबाबत जिल्हाधिका-यांसह शिक्षणाधिका-यांनाही कळवले आहे.
जिल्ह्यामध्ये गोवर-रुबेला लसीकरण मोहीम सुरू आहे. पहिल्या टप्प्यात शाळांमध्ये ही मोहीम राबविण्यात येत असून ९ महिने ते १५ वर्षे वयोगटाच्या विद्यार्थ्यांना लस दिली जात आहे. गोवर आजारामुळे ताप येणे, लालसर पुरळ येणे, निमोनिया, रातआंधळेपणा, मेंदूला ताप चढणे आदी गंभीर आजार होतात. तर रुबेला या आजारामुळे हाडीताप येणे, हृदयरोग, महिलांमध्ये गर्भपात होणे, बालकांमध्ये मतिमंद, मेंदूचा विकास न होणे, मोतीबिंदू, बहिरेपणा आदी आजार होतात. या सर्व रोगांवर मात करण्यासाठी १५ वर्षे वयोगटातील बालकांना लस देणे गरजेचे आहे. या लसीकरण मोहिमेला शहरातील मराठी व इंग्रजी माध्यमातील शाळांनी मुख्याध्यापकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. विद्यार्थ्यांमध्येही जागृती करुन लसीकरणासाठी मुख्याध्यापकांकडून प्रोत्साहन दिले जात आहे. मात्र शहरात असलेल्या उर्दू शाळांमध्ये या मोहिमेबाबत नकारात्मक भूमिकाच दिसून येत आहे. याच अनुषंगाने महापालिका आयुक्त लहुराज माळी यांनी शहरातील ७५ उर्दू शाळांच्या मुख्याध्यापकांची बैठक घेतली. स्थायी समिती सभापती शमीम अब्दुला यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. बैठकीत गोवर-रुबेला लसीकरणाचे महत्त्व समजावण्यात आले. उर्दू शाळांच्या शिक्षक व मुख्याध्यापकांनी पुढाकार घेवून गोवर-रुबेलाबाबतचे गैरसमज दूर करावे आणि या मोहिमेत जास्तीत जास्त विद्यार्र्थ्यांचे लसीकरण करुन घ्यावे, अशा सूचना केल्या आहेत.
त्याचवेळी कोणत्याही पालकाकडून गोवर-रुबेला लसीकरणासाठी संमतीपत्र बंधनकारक करु नये, असेही सुचित केले आहे. गोवर-रुबेलाबाबत मशीदमधून लाऊडस्पीकरद्वारे प्रसिद्ध करावी, प्रत्येक शाळेत स्थानिक नगरसेवकांचे सहकार्य घ्यावे, आदी सूचनाही या बैठकीत देण्यात आल्या.
गोवर-रुबेला लसीकरण मोहिमेत जबाबदारीने कार्य करावे, असेही सुचित करण्यात आले. यावेळी नगरसेवक सय्यद शेरअली अब्दुल खयुम, मोहमद नासेर, उपायुक्त विलास भोसीकर, उपायुक्त गीता ठाकरे, मुख्य लेखाधिकारी संतोष कंदेवार, शिक्षणाधिकारी दिलीप बनसोडे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सुरेशसिंह बिसने, डॉ. वासे, लसीकरण अधिकारी डॉ. मो. बदियोद्दीन आदींची उपस्थिती होती.
३६ हजार विद्यार्थ्यांचे लसीकरण
२७ नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या गोवर-रुबेला लसीकरणात नांदेड शहरात विविध शाळांमध्ये ३६ हजार ५०० मुलांना लस देण्यात आली आहे. शहरात एकूण ४९० शाळा व अंगणवाडी केंद्रामध्ये हे लसीकरण केले जात आहे. उर्दू माध्यमांच्या शाळामध्ये लसीकरणाबाबत असलेले गैरसमज दूर करण्यासाठी महापालिकेचे अधिकारी आपल्या पाल्यांना उर्दू शाळामध्ये लस देत आहेत.
लेखाधिकारी संतोष कंदेवार, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सुरेशसिंह बिसेन, मिश्रक शिवकुमार बिसेन या अधिकारी, कर्मचा-यांनी उर्दू माध्यमाच्या गोकुळनगर येथील फैजुल उलूम या शाळेत लस दिली.