नांदेड: शहरातील गोदावरी पात्रात १३ जून रोजी २ टन २७० किलो मासे मृतावस्थेत आढळले होते, या मागील कारणांचा अहवाल तब्बल १० दिवसानंतर आला, मात्र अहवालात स्पष्ट कारण देण्यात आले नाही.
नेमके कारण शोधण्यासाठी फॉरेन्सिक लॅबमध्ये मृत माशांचे नमुने पाठवण्यात आले होते, २ टन २७० किलो माशांचा मृत्यू विषामुळे झाला नाही, एवढेच अहवालात नमूद करण्यात आले, मात्र मृत्यू नेमका कुठल्या कारणाने झाला? याबाबत अहवालात काहीही नमूद करण्यात आले नाही.
१३ जूनला घडली होती घटना
शहरातून वाहणाऱ्या गोदावरी नदीकाठी जवळपास सर्वच घाटांवर माशांचा खच पडल्याचे आढळून आले होोते. मृत माशांमुळे परिसरात दुर्गंधी पसरली होती. नांदेड शहरातून गोदावरी वाहते, 'गुरु-ता-गद्दी'च्या काळात नदीकाठच्या सर्वच घाटांचा विकास करण्यात आला आहे. परंतु, नांदेड शहरातून निघणारे जवळपास 18 ड्रेनेज लाईनचे घाण पाणी थेट गोदावरी पात्रात सोडण्यात आल्याने पर्यावरण प्रेमींनी यापूर्वीच जलचर प्राणी प्राण्यांना धोका असल्याची शक्यता वर्तविली होती.
यापूर्वी देखील घडली होती अशी घटना
नांदेड शहरापासून जवळच असलेल्या शिकारघाट परिसरात आसना नदीत चार वर्षांपूर्वी अशाच प्रकारे मृत माशांचा खच पडला होता त्याचबरोबर इतर जलचर प्राणी मृत पावले होते. सदर घटना परिसरातील एका कारखान्याचे दूषित पाणी थेट नदीत सोडल्यामुळे घडली होती.