चोरट्यांनी दोन कृषीसेवा दुकाने फोडून बियाणांसह रोख रक्कम पळवली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2020 04:41 PM2020-06-24T16:41:42+5:302020-06-24T17:03:19+5:30
बियाणांच्या ३२ बॅग चोरट्यांनी चोरून नेल्या.
उमरी : शहरातील मोंढा मार्केटमधील कृषीसेवा केंद्राची दोन दुकाने फोडून चोरट्यांनी ४४ हजाराची रोकड व २१ हजारांचे बियाणे असा एकूण ६५ हजारांचा ऐवज चोरून नेला. बुधवारी सकाळी ही घटना उघडकीस आली.
मोंढा बाजारपेठेत संतोष सावंत यांच्या वरद कृषीसेवा केंद्राच्या छतावरील टिन पत्रे काढून चोरट्यांनी दुकानात प्रवेश केला. या दुकानातील १२ हजार रुपये रोख व कापूस बियाण्यांच्या पंधरा बॅग चोरून नेल्या. तसेच या दुकानाला लागूनच असलेल्या आनंद सलगरे यांच्या श्रीराम कृषीसेवा केंद्रात टिनपत्रे काढून चोरटे आत घुसले. दुकानातील ३२ हजार रुपये रोख व कापूस बियाणांच्या १७ बॅग चोरट्यांनी चोरून नेल्या.
सकाळी दुकान उघडल्यावर चोरी झाल्याचे दुकानदारांच्या लक्षात आले. त्यावरून पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलीस निरीक्षक अशोक अनंत्रे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. दोन्ही दुकानांचे पंचनामे करण्यात आले. शहरातील मोंढा मार्केटमध्ये पोलिसांची रात्रीची गस्त बंद असल्यामुळे चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. लॉकडाऊन नंतर आता व्यापार सुरु झालेला असतानाच उमरी शहरात चोरट्यांचा हैदोस वाढला आहे. पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवून चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे.