माहूर : भारत आणि चीनमध्ये सीमावादातून वाढणारा तणाव आणि सैनिकांमध्ये झालेली जीवघेणी झटापट या पार्श्वभूमीवर गत वर्षी २०२० मध्ये माहूर गडावरील रोप-वेच्या कामाचे चीनच्या एका कंपनीला कंत्राट देण्यात आलेल्या ५१ कोटी ३० लाखांच्या कामाला स्थगिती देण्यात आली होती. यापूर्वी केवळ एकच निविदा आल्याने ती निविदा प्रक्रिया रद्द करण्यात आली होती. आता मात्र तिसऱ्यांदा या रोप-वेच्या टेंडरसाठी प्रक्रिया सुरू झाली आल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाने दिली आहे.
साडेतीन शक्तिपीठापैकी पूर्ण पीठ असलेल्या श्रीक्षेत्र माहूरगड येथील श्रीरेणुकामाता, श्रीदत्त शिखर व श्रीअनसूयामाता मंदिराकरिता एरियल रोप-वेच्या कामास सडक परिवहन व राजमार्ग मंत्रालय भारत सरकारची लोकसभा निवडणुकीपूर्वीच मान्यता प्राप्त झाली होती. भाविक आणि पर्यटकांना सुखकर प्रवास व्हावा म्हणून श्रीरेणुकादेवीचे निस्सीम भक्त केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी गतवर्षी माहूर येथील एका कार्यक्रमात रोप-वेची घोषणा केली होती. या कामासाठी ५१ कोटी ३० लाख रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात येऊन सार्वजनिक बांधकाम विभागाकडून निविदा प्रक्रिया १० डिसेंबर १९ रोजी पूर्ण करण्यात आली होती. अधीक्षक अभियंता कार्यालय सार्वजनिक बांधकाम मंडळ नांदेड येथे निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर बीजीआर अँड कृष्णा इंटरप्राईजेस या चिनी कंपनीला सदर कंत्राट देण्यात आले होते. मात्र प्रशासकीय बाबी पूर्ण करत असताना मागील सहा महिन्यात या कामाला प्रत्यक्षात सुरुवात झाली नाही. दरम्यानच्या काळात चीनसोबत झटापटीत भारताचे २० जवान शहीद झाले होते. त्यामुळे संपूर्ण देशात चीनविरोधात संतापाची लाट पसरली होती. त्यातच भारत आणि चीनमधील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर सदर कंपनीचे कंत्राट रद्द करण्याचा निर्णय गत वर्षी २०२० मध्ये घेण्यात आला होता. तेव्हापासून रोप-वेचे काम व त्याची टेंडर प्रकिया रखडलेलीच होती.
याविषयी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता रवींद्र उमाळे यांच्याशी संपर्क करून माहिती घेतली असता नवीन योजना कार्यान्वित आली असून रोप-वेसाठीची निविदा लवकरच निघणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. प्रशासकीय कारणास्तव दोन वेळा रद्द झालेल्या निविदा प्रक्रिया आता तिसऱ्यांदा होणार असल्याने रोप-वेचे काम पूर्ण होण्यासाठी श्रीरेणुकाभक्तांना किती वाट बघावी लागणार हे सध्या अनिश्चित आहे.