नांदेड : दक्षिण मध्य रेल्वेने महत्त्वाच्या रेल्वेगाड्यांत तात्पुरत्या स्वरूपात डबे वाढवून प्रवासी सुविधेत वाढ केली आहे़ यामध्ये नांदेड - तिरूपती- नांदेड या विशेष एक्स्प्रेसला तीन डबे वाढविण्यात आले आहेत़
नांदेड जिल्हा व परिसरातील भाविक मोठ्या संख्येने तिरूपती येथे जातात़ त्यासाठी प्रत्येक महिन्यात रेल्वे गाड्यांची बुकींग हाऊसफुल्ल असते़ नांदेड रेल्वेस्थानकावरून तिरूपतीला सुटणाऱ्या गाड्यांची संख्या कमी असल्याने उपलब्ध रेल्वेला मोठी गर्दी असते़ भाविकांची सोयीसाठी रेल्वे विभागाने महत्त्वाच्या रेल्वेगाड्यांत तात्पुरत्या स्वरूपात डबे वाढविले आहेत़
नांदेड - तिरूपती- नांदेड या विशेष एक्स्प्रेसमध्ये नांदेड येथून २१ जानेवारी ते ३१ मार्च या कालावधीत सुटणाऱ्या गाड्यात दोन द्वितीय श्रेणी स्लीपर क्लासचे डबे आणि एक तृतीय श्रेणी वातानुकूलीत डबा असे तीन डबे वाढविण्यात आले आहेत़ परतीच्या प्रवासात तिरूपती येथून सुटणाऱ्या गाडीत २२ जानेवारी ते १ एप्रिल या कालावधीत दोन द्वितीय श्रेणी स्लीपर क्लासचे डबे आणि एक तृतीय श्रेणी वातानुकुलीत असे तीन डबे वाढविले आहेत़ तिरूपतीसाठी जाणाऱ्या भाविकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन विभागीय रेल्वे व्यवस्थापक उपिंदरसिंघ यांनी केले आहे़
२१ पासून प्रारंभनांदेड - तिरूपती- नांदेड या विशेष एक्स्प्रेसमध्ये नांदेडहून २१ जानेवारी ते ३१ मार्च या कालावधीत सुटणाऱ्या गाड्यात दोन द्वितीय श्रेणी स्लीपर क्लासचे डबे आणि एक तृतीय श्रेणी वातानुकूलीत डबा वाढविला आहे़