तरुणाच्या खुनात तिघांना जन्मठेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2019 12:29 AM2019-03-16T00:29:20+5:302019-03-16T00:29:39+5:30
विष्णूपुरी भागात दारु पिण्यासाठी बसलेल्या चार मित्रांमध्ये झालेल्या भांडणानंतर तिघांनी एकाला जबर मारहाण करीत खंजीरने वार करुन खून केला़ ही घटना २०१७ मध्ये घडली होती़ याप्रकरणी जिल्हा न्या़ व्ही़ के़मांडे यांनी तीन आरोपींना जन्मठेप आणि प्रत्येकी सहा हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली़
नांदेड : विष्णूपुरी भागात दारु पिण्यासाठी बसलेल्या चार मित्रांमध्ये झालेल्या भांडणानंतर तिघांनी एकाला जबर मारहाण करीत खंजीरने वार करुन खून केला़ ही घटना २०१७ मध्ये घडली होती़ याप्रकरणी जिल्हा न्या़ व्ही़ के़मांडे यांनी तीन आरोपींना जन्मठेप आणि प्रत्येकी सहा हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली़
१२ मार्च २०१७ रोजी विष्णूपुरी परिसरात दुपारी ३ वाजेच्या सुमारास मयत ज्ञानेश्वर बालाजी हंबर्डे याच्यासोबत सुनील भारती (रा़भारतीमठ, गाडीपुरा) व आकाश बालाजी बारसे (रा़विष्णूपुरी) हे दोघे जण दारु पीत बसले होते़ यावेळी त्यांच्या शेजारीच दारु पीत बसलेल्या रामा बळीराम गायकवाड रा़विष्णूपुरी याला ज्ञानेश्वर हंबर्डे याने आमच्यासोबत बस असे म्हणून बोलावून घेतले़ त्यानंतर ज्ञानेश्वरने रामाला तू श्याम मराठे याला का मारहाण केली, असे म्हणून वाद घातला़ त्यानंतर ज्ञानेश्वर याने रामाला मारहाण करण्यास सुरुवात केली़ हा प्रकार पाहून रामा आणि सुनील याने ज्ञानेश्वर हा नेहमी दारु पिऊन आपल्याला मारहाण करतो़ त्याला एकदाची अद्दल घडवू असे म्हणत त्यांनी ज्ञानेश्वरला मारहाण करण्यास सुरुवात केली़
सुनीलने जवळील चाकू काढला़ परंतु, झटापटीत तो खाली पडला़ यावेळी रामा याने तो चाकू उचलून ज्ञानेश्वरवर वार केले़ त्यात ज्ञानेश्वरचा जागीच मृत्यू झाला़ या प्रकरणी भास्कर बालाजी हंबर्डे यांच्या तक्रारीवरुन नांदेड ग्रामीण ठाण्यात गुन्हा नोंदविला़ फौजदार पीक़े़मराडे यांनी तपास करुन न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले़
न्यायालयाने या प्रकरणात नऊ साक्षीदार तपासले़ त्यानंतर न्या़व्हीक़े़मांडे यांनी रामा गायकवाड, सुनील भारती आणि आकाश बारसे या तिघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली़ सरकारच्या वतीने अॅड़संजय लाठकर यांनी बाजू मांडली़
आरोपीने पोलिसाला केली होती मारहाण
खुनाच्या प्रकरणाची नांदेड न्यायालयात सुनावणी सुरु असताना पालीस तिन्ही आरोपींना घेवून कोर्टात आले होते़ यावेळी जेवणाच्या कारणावरुन आरोपीने एका पोलीस कर्मचाऱ्याच्या कानशिलात लगाविली होती़ या प्रकरणात आरोपींच्या विरोधात वजिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता़